अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘केम छो’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यावरून अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी गुजरातचे की देशाचे पंतप्रधान आहेत, अशी विचारणा करत मराठी अस्मिता जागवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेनेही पंतप्रधानांच्या गुजराती असल्याचा उल्लेख करत मुंबईतील मराठी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, असे असले तरी आपापल्या मतदारसंघात असलेल्या गुजराती बांधवांची मते आपल्यालाच मिळावीत यासाठी शिवसेना उमेदवार व शिवसैनिक ‘केम छो’चाच आधार घेत आहेत.
महायुती भंगल्यामुळे विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलली आहे. आता शिवसेनेची मराठी, तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपची गुजराती मतदारांवर मदार आहे. मात्र, कालौघात मुंबईतून मराठी टक्का घसरल्याने शिवसेना उमेदवार चिंतेत पडले आहे. केवळ मराठी मतांवर विजयी होणे अवघड असून त्याला गुजराती आणि अन्य भाषकांच्या मतांची जोड मिळणे आवश्यक असल्याचे शिवसेनेच्या उमेदवारांना कळून चुकले आहे. परंतु भाजपबरोबर फारकत घेतल्यानंतर गुजराती मतदारांची मते मिळतील की नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. गुजराती मते आपल्याकडे वळविण्यासाठी ठिकठिकाणच्या शिवसेना उमेदवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
अनेक वर्षांपूर्वी उद्योगधंद्याच्या निमित्ताने मोठय़ा संख्येने गुजराती बंधू मुंबईत आले आणि मुंबईकर बनून गेले. या गुजराती बांधवांना निवडणुकांमध्ये फारसा रस नव्हता. मात्र अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठी झुंडीच्या झुंडीने घराबाहेर पडून गुजराती मतदारांनी मतदान करून आपणी कमी नसल्याचे दाखवून दिले होते. त्याच क्षणी महायुतीत असलेल्या शिवसेनेसाठी गुजराती मते चिंतेचा विषय बनली होती. महायुती तुटल्याने आता गुजराती मते शिवसेनेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे गुजरातीबहुल भागामध्ये शिवसेना उमेदवार घरोघरी भेटी देत आहेत. तसेच गुजराती समाजातील संस्था-संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. गुजराती समाजाच्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून भेटी देत आहेत. भाजप उमेदवारांना याची कुणकुण लागताच त्यांनीही या मतदारांना पायघडय़ा घालण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदींच्या निमित्ताने भाजपकडे वळलेला तमाम गुजराती वर्ग इतर पक्षांकडे आकर्षित होऊ नये याची काळजी भाजपचे स्थानिक नेते घेऊ लागले आहेत. एकंदर गुजराती मतदारांना आपल्याकडे राखण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याचे चित्र मुंबईत दिसत आहे.