श्रीराम जय राम जय जय राम चा जयघोष.. आकर्षक लोकनृत्य व चित्ररथ.. शोभायात्रेच्या मार्गावर जागोजागी भगव्या पताका, ध्वज.. केळींच्या पानांचे प्रवेशद्वार.. मार्गावर रंगबेरेगी रांगोळ्या आणि रामभक्तांचा प्रचंड उत्साह, अशा वातावारणात विदर्भातील विविध जिल्ह्य़ात शोभायात्रा काढून रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
नागपुरात पोद्दारेश्वर मंदिर, पश्चिम नागपुरातील राममंदिरातून आणि उत्तर नागपुरातून शिवमंदिरातून शोभाायात्रा निघाली. जणू काही नागपूरनगरीत अयोध्या अवतल्याचे चित्र होते. विदर्भात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि श्रीरामाचा जयजयकार करीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
विदर्भात अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया आदी शहरांमध्ये रामजन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आल्या. नागपूरचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव म्हणून देशभरात ओळखली जाणारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा पारंपरिक पद्धतीने श्रीरामच्या जयघोषात व रामभक्तांच्या जल्लोशात निघाली. शोभायात्रा पाहण्यासाठी शहर आणि जिल्ह्य़ातील हजारो रामभक्तांनी गर्दी केली होती.
शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक विषयांवर आधारित ६० चित्ररथ, १६ बहारदार लोकनृत्यांसह छोटय़ा चित्ररथांचाही समावेश होता.
गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत दुपारी १२ वाजता प्रभूरामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर दुपारी ४ वाजता पोद्दारेश्वर मंदिरातील प्रभूरामचंद्राची मूर्ती आकर्षक अशा हरिहार रथात ठेवण्यात आली. महापौर अनिल सोले यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळी खासदार विलास मुत्तेमवार, नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आमदार दीनानाथ पडोळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, माजी मंत्री रमेश बंग, उपमहापौर संदीप जाधव, शहर काँग्रेस अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, भाजपचे प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, माजी मंत्री अनिस अहमद, शेख हुसेन, दयाशंकर तिवारी,    स्थायी    समिती  अध्यक्ष अविनाश ठाकरे, पोलीस आयुक्त के.के. शर्मा, श्यामसुंदर पोद्दार, सुरेश शर्मा, हजारीलाल अग्रवाल उपस्थित होते.
पश्चिम नागपुरात रामनगरातील राममंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. यात ५० वर आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. दरम्यान, नागपूरपासून ६० कि.मी. असलेल्या रामटेकमध्ये राममंदिरात हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.