पनवेलच्या विकासाच्या दृष्टीने एकीकडे त्याचा विस्तार वाढत चालला असताना दुसरीकडे पनवेलच्या अस्तित्वाच्या खुणा मिटल्या जाऊ लागल्या आहेत. अनेकजण विस्ताराच्या या स्पर्धेत मूळ पनवेलचा उल्लेख जुने पनवेल असे करू लागल्यामुळे भूमिपुत्र पनवेलकरांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी प्रकर्षांने जाणवल्यामुळे येथील आमदारांनी अखेर ‘जुने पनवेल’ नको, ‘पनवेल’ म्हणा व लिहा अशी कळकळीची विनंती येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना केली आहे. तसा विनंतीवजा सूचनेचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
 पनवेल शेजारी सिडकोने बांधलेल्या नवीन पनवेल वसाहतीमुळे या जुन्या व नवीन नावाचा वाद सुरू झाला आहे.  पनवेलची ओळख ही मुंबईचे प्रवेशद्वार अशी आहे.
तुळतुळीत महामार्गामुळे पनवेल हे महामुंबईतील मुख्य शहर असणार आहे. भाताच्या कोठाराची मुख्य बाजारपेठ तसेच वाडय़ांचे गाव अशी ख्याती पनवेलची होती. काँक्रीटीकरणाच्या स्पर्धेत वाडे लुप्त झाले. मात्र राहिले ते पनवेलचे नाव. हे नाव जुन्या व नवीन वादात राहू नये म्हणून व पनवेलकरांची नाराजीही दूर व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रीतसर पत्रव्यवहार करून पनवेल हे नाव अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे.  डॉक्टर, व्यापारी, सामाजिक संस्था यांनाही त्यांनी पत्र पाठविले आहे.
प्रसिद्धीसाठी फलक लावताना यापुढे जुने पनवेल हा शब्दप्रयोग न करता पनवेल असाच उल्लेख करण्याचा आग्रह त्यांच्या वतीने करण्यात आला आहे. वय वर्षे दीडशे असणाऱ्या पनवेल नगर परिषदेतून पनवेलच्या खाणाखुणा जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.