News Flash

सिंहस्थासाठी शहरात ७०० दिशादर्शक फलक

धार्मिकदृष्टय़ा विशेष महत्त्व लाभलेल्या कुंभमेळ्यात दाखल होणाऱ्या देशविदेशातील लाखो भाविकांना शहर व परिसरातून मार्गक्रमण करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये या दृष्टिकोनातून शहरात

| March 5, 2015 08:19 am

धार्मिकदृष्टय़ा विशेष महत्त्व लाभलेल्या कुंभमेळ्यात दाखल होणाऱ्या देशविदेशातील लाखो भाविकांना शहर व परिसरातून मार्गक्रमण करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये या दृष्टिकोनातून शहरात वेगवेगळ्या पद्धतींचे तब्बल ७०० हून अधिक दिशादर्शक फलक उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, भाविकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी या फलकाद्वारे दिली जाणारी माहिती मराठी, इंग्रजीसह अन्य दोन भाषेतही देण्याचा मानस आहे. महापालिका व पोलीस यंत्रणेने या फलकांसाठी जागांची निश्चिती केली असून नवी दिल्लीतील फलकांच्या धर्तीवर त्यांची उभारणी केली जाणार आहे.
पुरातन काळापासून अलाहाबाद, हरिद्वार, उज्जन व नाशिक-त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळा भरतो. यंदा नाशिक-त्र्यंबक परिसरात कुंभमेळा होणार असून तो नेटका पार पडावा यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जुलै महिन्यापासून कुंभपर्वास सुरुवात होत आहे. आगामी कुंभमेळ्यात देशभरातून ८० लाख ते एक कोटी भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. देशविदेशातील वेगवेगळ्या प्रांतांतून येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बाहेरून येणारे पर्यटक, भाविक यांना नाशिक-त्र्यंबक परिसरात कुंभपर्वात योग्य माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र माहिती कक्ष उभारण्यात येणार आहे. याशिवाय संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. भाविकांना शहर परिसरात मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महापालिका आणि पोलीस विभागाने वाटाडय़ाची भूमिका स्वीकारली आहे.
शहरात वेगवेगळ्या धाटणीचे जवळपास ७०० हून अधिक दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. यासाठी खास इंडियन रोड कॉपरेरेशनच्या (आयआरसी) मार्गदर्शक तत्त्वानुसार संपूर्ण शहरात वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने फलक उभारले जाणार आहेत. त्यात रस्त्याच्या बाजूला शोल्डर माऊंटेड (६००), कॅन्टीलेव्हर (१५०) आणि कमान पद्धतीतील गॅॅ्रन्टी (३०) या तीन पद्धतींचा समावेश आहे. नवी दिल्लीत रस्त्यांचे नामफलक अतिशय वेगळ्या धाटणीचे आहे. त्याचा संदर्भ घेऊन नाशिक शहरात दिशादर्शक फलकांची उभारणी केली जाईल. शहरात दाखल होताना, फिरताना आणि परतताना केवळ फलक पाहून सहजपणे मार्गस्थ होईल याची दक्षता नियोजनावेळी घेण्यात आली आहे. पोलीस यंत्रणेच्या मदतीने या फलकांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
पर्यटकांची दिशाभूल होऊ नये यासाठी अंतर्गत भागात तात्पुरत्या फलकांवर आजूबाजूला असलेल्या ठिकाणांची माहिती नकाशाच्या माध्यमातून दर्शविली जाईल. किती किलोमीटरवर कुठले ठिकाण, तिथे कसे जाता येईल असा संपूर्ण तपशील दिला जाणार आहे. काही ठिकाणी तात्पुरते दिशादर्शक फलक विविध महत्त्वाच्या पर्यटक स्थळांसोबत अन्य काही माहिती देण्यासाठी लावण्यात येतील. रेल्वे स्थानक, बस स्थानक, वाहनतळे, साधुग्राम, रामकुंड, सर्व घाट आणि शहर परिसरातील महत्त्वाचे रस्ते व मुख्य चौकात हे फलक लावण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 8:19 am

Web Title: simhastha kumbh mela in nashik
टॅग : Nashik
Next Stories
1 भरती प्रक्रियेच्या मुद्दय़ामुळे बिऱ्हाड आंदोलन कायम
2 नाशिकमध्ये वाहनचोरीचे सत्र
3 स्वाइन फ्लूविरोधात जनजागृतीचे अस्त्र
Just Now!
X