इमारत बांधकाम परवानगी संदर्भात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असून त्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करून ते पुणे, नाशिक आणि अमरावती शहराचा दौरा करून तेथील परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल देतील आणि त्यानंतर दोन महिन्यात ही योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्थापत्य विद्युत व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संदीप जोशी यांनी दिली.
महापालिकेत इमारत बांधकाम परवानगी संदर्भात एक खिडकी योजना सुरू करण्यासंदर्भात महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ बिल्डर्स असोसिएशन (क्रिडाई) आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स असोसिएशच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे महापालिकेत एक खिडकी योजना लागू करण्यात येणार असून त्या संदर्भात काम सुरू करण्यात आले आहे. स्थापत्य विद्युत व प्रकल्प विशेष समितीकडे हे काम राहणार आहे. महापालिकेचे अभियंता श्रीकांत देशपांडे, अनिल गेडाम यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती या आठवडय़ात नाशिक, पुणे आणि अमरावती शहराचा दौरा करून तेथील परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल विशेष समितीला देतील. याविषयी र्सवकष विचार विनिमय करून सर्वाच्या सूचनाच्या विचार करून दोन महिन्यात ही योजना सुरू करण्यात येईल, असेही जोशी यांनी सांगितले.
नागरिकांना कायद्याने सेवा हमी द्यायची असल्याने एक खिडकी योजना ही यातील महत्त्वाची बाब आहे. यावेळी संघटनांनी अनेक अडचणी आणि उपाययोजना सूचवून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
विकास नियंत्रण नियमामधील मधील ग्रुप हाऊसिंगची व्यथ्या व त्यांचा योग्य अर्थ लावणे, सिव्हील लाईन्स येथील भूखंडाना १.२५ एफएसआय देण्याची शक्ती, इमारतीभोवती सामाजिक अंतर सोडण्याच्या नियमामध्ये शिथिलता प्रदान करणे, टीडीआर मोकळा न करणे, अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्यावेळी होणारा त्रास आदी सूचना आणि तक्रारी त्यांनी केल्या. नागपुरात हिवाळी अधिवेशन असल्यामुळे या संदर्भात लवकरच नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.