रेल्वे रूळ ओलांडताना अपघात किंवा मृत्यू होण्याच्या घटना रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवर पादचारी पूल उभारण्याचे ठरविले आहे. मध्य रेल्वेमार्गावरील या स्थानकांमध्ये रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मध्य रेल्वेमार्गावर कल्याण, ठाकुर्ली, कुर्ला, ठाणे या स्थानकांदरम्यान रेल्वेरूळ ओलांडताना अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या चार वर्षांतील आकडेवारीनुसार मध्य रेल्वेवर साडेपाच हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी अथवा जखमी झाले आहेत. चालू वर्षांतच पाचशेहून अधिक लोक रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. यात सर्वात जास्त अपघात हे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतात.
ही बाब लक्षात घेऊन एमआरव्हीसीने काही प्रमुख स्थानकांवर पादचारी पूल उभारण्याचे काम हाती घेण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पासाठीचा आराखडा निश्चित झाला असून प्रत्येक स्थानकाचे निरीक्षण करून पादचारी पुल उभारण्याचे स्थानही निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गतच ठाण्यातील नवीन पादचारी पूल हा ठाणे पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाला जोडण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
या प्रकल्पांतर्गत दादर, ठाकुर्ली, कल्याण, ठाणे, कांजूरमार्ग आणि कुर्ला या स्थानकांवर हे पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. कुर्ला येथील मुंबईच्या दिशेच्या पुलाच्या रूंदीकरणाचे काम या प्रकल्पाच्या कक्षेत येत नसून ते मध्य रेल्वे स्वतंत्रपणे करणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. कांजूरमार्ग येथे मुंबईच्या दिशेने पश्चिमेला हा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. याबाबतची सगळी सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. प्रवाशांनी पादचारी पुलांचा वापर करावा, याबाबत आम्ही नेहमीच आग्रही असतो. गेल्या चार वर्षांतील अपघातांची संख्या पाहता, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे काम आम्ही करत आहोत. आता प्रवाशांनीही या पुलांचा वापर करण्याची समजदारी दाखवावी, असे आवाहन या अधिकाऱ्याने केले आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना मृत व जखमी
                  २०१०    २०११    २०१२    २०१३(*)    एकूण
मृत्यू          १३२३    १२०७    १२६१    ४९४          ४२८५
अपघात       ३८८    ३८२    ३२८        १३६          १२३४
एकूण        १७११    १५८९    १५८९    ६३०          ५५१९
(* २०१३ ची आकडेवारी जुलै महिन्यापर्यंतची आहे.)