अमरावती जिल्ह्य़ात वाळू तस्करांचा हैदोस सुरूच असून गेल्या दोन दिवसात महसूल यंत्रणेने जिल्ह्य़ात तीन ठिकाणी कारवाई करून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर्स पकडले. तस्करांसाठी सुटीच्या दिवशी वाळू ‘फ्री सेल’ बनली आहे. अनेक भागात यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने वाळूचा प्रचंड उपसा सुरू आहे.
धारणीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी अचानक धारणीजवळच्या उतावली येथे सिपना नदीकाठी छापा घातला तेव्हा चार ट्रॅक्टर्समध्ये अवैधरीत्या वाळू भरली जात होती. तहसीलदारांच्या आदेशावरून हे चारही ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले. सिपना नदीचा काठ आता तस्करांसाठी खुला झाला असून अनेक भागात विनापरवाना वाळूचा उपसा आणि वाहतूक सुरू आहे. तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत एम.एच. २७ / ए ८४६६, एम.एच. २७ / सी ७४६१, एम.एच. २७ / एल ८०९२, आणि एम.एच. २७/ ६२२१ या क्रमांकाचे ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले. यावेळी वाळू भरणाऱ्या मजुरांचीही चौकशी करण्यात आली. परतवाडा शहरातील कांडली परिसरात एम.एच. २७ / एफ ९२५० क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून विनापरवाना वाळूची वाहतूक केली जात असल्याचे तहसीलदार अनूप खांडे यांच्या कारवाईदरम्यान निदर्शनास आले. प्रवीण कादळकर यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी म्हसोना येथील हितेश दहीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. रेती आणि ट्रॅक्टर मिळून ४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
धामणगाव ते परसोडी मार्गावर महसूल यंत्रणेने केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर दिसून आला. संजय मांडवगणे यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी शिवपाल पाटणे (४५, रा. पुलगाव) आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कारवाईदरम्यान ट्रॅक्टरमालक पळून गेला. जिल्ह्य़ातील विविध भागात वाळू तस्करी सुरू असताना कारवाई करण्यात महसूल यंत्रणा मात्र अपुरी पडू लागली आहे. पूर ओसरल्यानंतर मुक्त झालेली वाळू हस्तगत करण्यासाठी तस्कर सरसावले आहेत. सुटीच्या दिवशी कारवाई होत नसल्याचे पाहून हे दिवस तस्करांसाठी पर्वणीच ठरू लागले आहेत. रेती घाटांच्या व्यतिरिक्त नवीन ठिकाणे शोधून वाळूचे उत्खनन करणे हा या तस्करांचा उद्योग आहे. सध्या बांधकामासाठी रेतीची मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. रेतीचे दरही वाढलेले आहेत. अवैधरीत्या उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवण्यासोबतच चढय़ा दराने रेती विकण्याच्या या उद्योगाला यंत्रणांमधील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांचाही हातभार असल्याने तस्करांचे बळ वाढल्याचे दिसून येत आहे.