कल्याण-डोंबिवली परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिक सुट्टीनिमित्त गावी गेले असल्याने बंद घरे फोडून दिवसाढवळ्या चोऱ्या केल्या जात आहेत. पोलिसांनी त्वरित या चोरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेने दिला आहे.  
सकाळ- संध्याकाळच्या वेळेत पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेला जात आहे. सोनसाखळी, मंगळसूत्र गळ्यातून खेचताना अनेक महिलांच्या मानेला हिसका बसत असल्याने, महिलांच्या जिवाशी खेळून हे प्रकार राजरोजसपणे चोरटय़ांकडून सुरू आहेत. जवाहिऱ्यांवर दरोडे टाकले जात आहेत.
हे प्रकार रोखण्यासाठी डोंबिवली परिसरात गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पोलिसांकडे केली आहे. या भेटीच्या वेळी सदानंद थरवळ, अरविंद बिरमोळे, संतोष चव्हाण, किशोर मानकामे, अभिजीत थरवळ आदी उपस्थित होते.
पोलिसांची धडक मोहीम
कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती गुन्हेगारी विचारात घेऊन पोलिसांनी शनिवारपासून शहरात ‘धडक शोध मोहीम’ सुरू केली आहे. दिवसा-रात्रीच्या वेळेत पोलिसांचे पथक वाहने तपासणे, संशयितांची तपासणी करणे, हॉटेल, बारमध्ये अचानक जाऊन तेथे तपासणी करणे, खतरनाक गुन्हेगारांच्या निवासाची अचानक झडती घेणे, तडिपार गुंडांचा मागोवा घेणे अशी कार्यवाही पोलीस पथकाकडून सुरू करण्यात आली आहे.
दक्ष नागरिक संघाचे ईगल ब्रिगेड पोलिसांच्या पथकासोबत कार्यरत आहे. गुन्हा घडण्यापूर्वी गुन्हेगार हॉटेल, ढाबा या ठिकाणी लपून बसलेले असतात. यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात बदलून आलेले बहुतांशी पोलीस अधिकारी हे ग्रामीण भागातून आले आहेत. अनेकांना शहरी भागातील कामाचा अनुभव नाही. त्यामुळे हे पोलीस अधिकारी सावध पावले टाकत असल्याने चोर त्याचा गैरफायदा उचलत असल्याचे बोलले जाते.