अनेक महत्त्वपूर्ण विषय पटलावर असूनही पालिका आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीस उपस्थित राहत नसल्याने जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत बैठक नाही, असा निर्णय गुरुवारी सभापती रमेश धोंगडे यांनी जाहीर केला. सदस्यांनी या मुद्दय़ावरून रण माजविले असले तरी त्यांची खदखद काही वेगळीच असल्याचे सांगितले जाते. आयुक्त आपल्या अधिकारात काही कामे परस्पर देत असल्याने अस्वस्थ सदस्यांनी त्यांना लक्ष्य केल्याचे सांगितले जाते.
गुरुवारी स्थायी समितीची सभा सभापतींच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या वेळी आयुक्त संजय खंदारे अनुपस्थित होते. हाच धागा पकडून शिवाजी सहाणे, अशोक मुर्तडक व अन्य काही सदस्यांनी त्याबद्दल विचारणा केली. महिनाभरापासून आयुक्त सभेला आलेले नाहीत. खत प्रकल्पात लाखो रुपयांची यंत्रणा धूळ खात पडल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर चर्चा झाल्यावर खत प्रकल्पाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. आयुक्तांनी चौकशीची जबाबदारी वादग्रस्त अधिकाऱ्याकडे सोपविली. अद्याप हा चौकशी अहवाल सभेसमोर सादर झालेला नाही. भूसंपादनाच्या विषयावर प्राधान्यक्रम ठरवून चर्चा होणे अपेक्षित होते. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश अद्याप निर्गमित झालेले नाहीत, आदींबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे. मागील तीन ते चार सभांपासून ते स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली.
सदस्यांची भावना लक्षात घेत सभापतींनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर नाराजी प्रगट करीत जोपर्यंत ते बैठकीस येणार नाहीत, तोपर्यंत ही बैठक होणार नसल्याचे जाहीर केले. स्थायीतील या घडामोडींमागे वेगळेच कारण असल्याची चर्चा आहे.
दीड ते दोन महिन्यांपूर्वी शासनाने पालिका आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्थिक अधिकारात वाढ केली. या अधिकारांचा संबंधितांकडून वापर केला जात असल्याने अनेक विषय स्थायीवर न येताच परस्पर कामे दिली जातात. यामुळे स्थायीतील काही सदस्य अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. त्याची परिणती आयुक्तांना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा आहे.