राज्यात दुष्काळ असला तरी भाजीपाल्याचा मात्र सुकाळ झाला आहे. श्रीरामपूर बाजार समितीत जिल्ह्य़ाबाहेरची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे घाऊक बाजारातील दर मोठय़ा प्रमाणात कोसळले असून एकीकडे शेतकऱ्यावर तोटा सहन करण्याची पाळी आली आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी नफेखोरी केल्याने दुसरीकडे किरकोळ बाजारात पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांनाही दिलासा मिळू शकला नाही.
दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. ५० ते ८० रुपये किलो किरकोळीचा दर झाला होता. विहीर व कूपनलिकांना कमी पाणी असल्याने, तसेच भविष्यात पाऊस झाला नाही तर मोठे नुकसान होण्याची शक्यता गृहित धरून शेतकरी भाजीपाल्याकडे वळले. पोषक हवामानामुळे उत्पादन चांगले निघाले. पण भाव कोसळल्याने मोठे नुकसान त्याला सोसावे लागत आहे.
श्रीरामपूर बाजार समितीच्या आवारात दररोज भाजीपाल्याचे लिलाव होतात. शेतकऱ्यांच्या मालाला एका किलोला मिळालेला दर पुढीलप्रमाणे (दर रूपयांत) बटाटा १३ ते १५, कोबी २ ते ५, फ्लॉवर १ ते ३, भेंडी १० ते १६, गवार २० ते ३५, दुधीभोपळा ३ ते ५, डांगर १५ ते ३५, ढेमसे ६ ते ११, घोसाळे २० ते २५, कारले ८ ते १३, दोडका १० ते २०, टोमॅटो ४ ते ६, वांगी १० ते १६, वाल १० ते २२, चवळीशेंगा १० ते २५, ढोबळी मिरची ८ ते १५, शेवगा २० ते ३४, लसून ५ ते १५, अद्रक १२ ते ३५. भाजीपाल्याच्या एका जुडीचा दर पुढीलप्रमाणे- मेथी २ ते ३, मुळा १ ते २, पालक २ ते ३, कोथंबीर २ ते ५, करडई २ ते ३, कांदापात २ ते ३, कडीपत्ता १ ते २.
बाजार समितीत गुजरात व नाशिक भागातून भाजीपाल्याची आवक सुरू झाल्याने घाऊक विक्रीचे दर कमी झाले आहेत. टोमॅटो, काकडी, मेथी, फ्लॉवर, कोबी यांच्या भावाचा निच्चांक झाला आहे. कांद्याचे भाव ६ ते ८ रूपये एवढे आहेत. घाऊक बाजारातील दर घटले असले तरी किरकोळीचे दर मात्र विक्रेत्यांनी म्हणावे असे कमी केले नाही.