विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामीण भागातील डॉक्टरांनी पुकारलेला संप आज सातव्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळाला असून हे सर्व डॉक्टर्स उद्या, मंगळवारी सकाळी ८ वाजता कर्तव्यावर परतणार आहेत. या संपात नागपूर विभागातून १२००, तर नागपूर जिल्ह्य़ातील ३३६ डॉक्टर्स सहभागी झाले होते. यात उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयासह नागपूर शहरातील डागा व प्रादेशिक मनोरुग्णालयातील डॉक्टरांचाही समावेश होता.  
या संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली होती. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनही होत नव्हते. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या भरवशावर आरोग्य सेवा सुरू ठेवण्याचा शासनाने प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. गर्भवती प्रसूतीसाठी शहरातील शासकीय रुग्णालयात येत असल्याने त्यांची संख्या वाढली होती. डॉक्टरांवर कामाचे ओझे वाढले होते. त्यामुळे हा संप लवकरात लवकर निवळावा, अशी मागणी होत होती. इकडे, संपूर्ण राज्यात जिल्हास्तरावर धरणे आंदोलने सुरु होती. तर मुंबईतील आझाद मैदानावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड आणि सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार यांनी उपोषण सुरू केले होते. गेल्या तीन दिवसांपासून वाटाघाटी सुरू होत्या. परंतु त्यात यश आले नाही. शेवटी सरकारने मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. परंतु संपकर्त्यां डॉक्टरांनी त्यालाही भीक घातली नव्हती. त्यातच आरोग्य सेवेतील वर्ग १ च्या अधिकाऱ्यांनीही या संपाला पाठिंबा दिल्याने हा संप आणखी चिघळणार अशीच चिन्हे दिसत होती. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला सह्य़ाद्री येथे चर्चेसाठी बोलावले. यानंतर तडजोड होऊन संप मागे घेण्यात आल्याचे संघटनेने जाहीर केले. आता उद्या, मंगळवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्य़ातील ३३६ डॉक्टर्स कामावर हजर होणार असल्याची माहिती संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. विद्यानंद गायकवाड यांनी दिली.c