बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस.. रेडिओवरील प्रक्षेपणात होणारी खरखर.. महापालिकेच्या एकाच शाळेत अनेक शाळांचे विद्यार्थी सामावल्याने दाटीवाटीत चाललेला गोंधळ.. काही खासगी शाळांत ‘प्रोजेक्टर’वर तर कुठे टीव्हीवर सुरू असलेले भाषण.. अशा संमिश्र वातावरणात शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमामुळे शिक्षक दिनी विद्यार्थ्यांकडून आयोजिल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांवर गदा आली. पंतप्रधानांचे भाषण सर्व शाळांमध्ये ऐकविले जाणार असल्याने यंत्रणेची व शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आवश्यक ती व्यवस्था झाली नाही. यामुळे काही ठिकाणी रेडिओवर हे भाषण ऐकावे लागले. महापालिकेने शाळांमधील प्रोजेक्टर व संगणकांची तपासणी केली. ज्या ठिकाणी नेटची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी केबल व ‘डोंगल’ची व्यवस्था केल्याचा दावा शिक्षण मंडळाने केला. प्रत्यक्षात मात्र वेगळीच स्थिती होती. धूळ खात पडलेल्या यंत्रणेला सुरू करण्यासाठी येणारा खर्च कोण करणार हा प्रश्न होता. यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात आला. प्रोजेक्टर व अन्य खर्च लक्षात घेऊन महापालिकेने एकाच शाळेत अन्य काही शाळांचे वर्ग बसविल्याने झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन करताना शिक्षकांना कसरत करावी लागली.
त्यातच मुसळधार पाऊस सुरू असल्याने पालिकेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसविण्यात आले. ज्या ठिकाणी काही व्यवस्था झाली नाही, तिथे रेडिओ ध्वनिक्षेपकाला जोडून मोदींचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले. खासगी शाळांमध्ये उलट स्थिती राहिली. विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोजेक्टर’ची व्यवस्था करण्यात आली. काही ठिकाणी टीव्हीद्वारे विद्यार्थ्यांनी भाषणाचा आनंद घेतला.