26 February 2021

News Flash

वास्तववादी भूमिकेमुळे भालेकरांची कारकीर्द चर्चेत

ऐन उमेदीत असताना रमेश वैद्य याचा खेळाडू म्हणून असलेला दर्जा कितीतरी उच्च होता. तो जर व्यवस्थित वागला असता तर सुनील गावस्करपेक्षा

| November 29, 2013 09:26 am

ऐन उमेदीत असताना रमेश वैद्य याचा खेळाडू म्हणून असलेला दर्जा कितीतरी उच्च होता. तो जर व्यवस्थित वागला असता तर सुनील गावस्करपेक्षा आधी रणजी खेळला असता..
व्यक्ती पारख आणि वास्तववादी मतांसाठी ओळखले जाणारे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व गृहरक्षक दलाचे माजी जिल्हा समादेशक सुधाकर शंकरराव भालेकर (६२) यांचे हे विधान त्यांच्या समकालीन क्रिकेटपटूंना आणि ज्यांनी वैद्य यांचा खेळ जवळून पाहिला अशा क्रिकेटप्रेमींना निश्चितच पटू शकेल. भालेकरांच्या निधनाबरोबरच एक कठोर प्रशासक आणि सहकाऱ्यांमधील गुणांची पारख करण्यासारखे अनेक गुण त्यांच्याबरोबर लुप्त झाले. आता उरल्यात फक्त त्यांच्या आठवणी, त्यांनी मारलेल्या गप्पा.
जुलै १९८८ मध्ये भालेकर हे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांची अध्यक्षपदाची उणीपुरी वर्षभराची कारकीर्द विविधदृष्टय़ा चर्चेत राहिली. मुळात त्यांची अध्यक्ष म्हणून निवडही अधिक गाजली. सैन्यदलात काम केलेले असल्याने एकदा निर्णय घेतल्यावर मागे हटणे नाही, ही वृत्ती त्यांना कधी नुकसानकारकही ठरली तर कधी फायदेशीरही. १९८७ च्या निवडणुकीत भालेकर यांनी संघटनेची सूत्रे खेळाडुंच्याच हाती असावीत, हा मुद्दा रेटत इतर सहकाऱ्यांसह खेळाडू पॅनल तयार केले. आपल्या पॅनलमध्ये खेळाडूच असावेत, असा त्यांचा आग्रह होता. त्याकाळी निवडणुकीच्या सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू ‘मेहेर पाँइंट’ ठरले होते. येथेच रात्री उशिरापर्यंत चर्चा रंगत असे आणि डावपेच लढविले जात असत. खेळाडू पॅनल आणि विशेषत: भालेकर यांना पराभूत करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न होऊनही त्यांच्या पॅनलचे आठ जण निवडून आले. स्वत: भालेकर हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. भालेकर अध्यक्ष होऊ नये यासाठीही प्रयत्न झाले. परंतु प्रत्येक अडचणींवर मात करीत जुलै १९८८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
जिल्हा संघटनेचा कारभार स्विकारल्यानंतर खेळाडूंचे हित हा प्रमुख विषय त्यांनी नजरेसमोर ठेवला. कित्येक वर्षांपासून जिल्ह्याच्या संघात कोणताही बदल झाला नव्हता. नवीन खेळाडूला जिल्हा संघात प्रवेश करणे म्हणजे भारतीय संघात प्रवेश करण्यासारखे कठीण झाले होते. त्याच त्या खेळाडुंनी जागा अडविल्यामुळे त्यांच्यापेक्षा अधिक गुणवंत खेळाडू संघाबाहेरच होते. भालेकरांनी सर्वप्रथम जे खेळाडू हवेत, त्यांची आणि जे नकोत त्यांची यादी तयार केली. तोपर्यंत संघात त्यांच्यासह जिल्हा निवड समितीचे तत्कालिन अध्यक्ष रमेश वैद्यही संघात होते. निवड समितीचाच अध्यक्ष संघात हा प्रकारच अजब होता.  नवोदितांसह प्रस्थापितांच्या निवड चाचणी शिबिरात एका ज्येष्ठ खेळाडूने पंचांचा निर्णय मान्य न करता स्टम्पांना लाथ मारण्याचा प्रकार घडला. सरावाला उशिराने येणे, सुचनांचे पालन न करणे अशा गोष्टी त्याच्याकडून घडत गेल्या. सैन्यात काही दिवस काढल्यामुळे शिस्त नसानसात भिनलेल्या भालेकरांनी त्या खेळाडूला घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी आईच्या निधनामुळे एक खेळाडू चाचणीस उपस्थित राहू शकला नव्हता. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संघात स्थान दिले. या मुद्याचा बाऊ करीत वगळलेल्या त्या खेळाडूने मग थेट जिल्हा संघटनेचे पदसिध्द अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी दिनकर पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले. संघ निवडीत पैसे खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. निर्णयावर भालेकर ठाम राहिले. अखेर त्याच संघातील चार जणांची निवड त्या वर्षीच्या रणजी चाचणीसाठी झाली. हे त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचे फलित म्हणावे लागेल.
ग्रामीण भागात क्रिकेट पोहोचविण्यासाठी तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिरांचा उपक्रम भालेकरांनी सुरू केला. रमेश वैद्य यांसह इतर काही क्रिकेटपटू या शिबिरांमध्ये मार्गदर्शनासाठी जात असत. लासलगावमध्ये ब्रम्हेचा चषक क्रिकेट स्पर्धा त्यांनी सुरू केली. जिल्हा संघटनेच्या कार्यक्षेत्रात येत नसतांनाही संगमनेर येथे २६ जानेवारी रोजी क्रिकेट स्पर्धा सुरू केली. १९८३ पासून जिल्हा व राज्य संघटनेतील वादामुळे बंद पडलेल्या जसदनवाला आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेस संजीवनी देण्याचे कामही त्यांनी केले.
आंतर तालुका स्पर्धा सुरू करून क्रिकेटचे सर्व साहित्यही संघांना पुरविण्याची त्यांनी व्यवस्था केली. तेव्हां रणजीच्या धर्तीवर महिला क्रिकेट स्पर्धा होत नसली तरी महिला क्रिकेटला उत्तेजन देण्याचे काम सुरू झाले होते. भालेकर अध्यक्ष असतानाच नांदगावची किरण जोशी, इगतपुरीची भावना गवळी, नाशिकची शर्मिला साळी या तीन खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या संघात झाली होती. बहुतेकांकडे क्रिकेटच्या सर्व साहित्याचा अभाव
असताना भालेकरांकडे ते होते. म्हणून तेच साहित्य अनेक जण वापरत.
माजी रणजीपटू राजू भालेकर मदतनिधी सामना केवळ आर्थिक कारणांमुळे नाशिकला होऊ शकला नाही. याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. स्वत: उत्कृष्ठ खेळाडू असलेल्या भालेकरांची देहयष्टी कोणालाही हेवा वाटावा अशीच. परंतु नियतीच्या गोलंदाजीपुढे कोणी टिकाव धरू शकत नाही हेच खरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 9:26 am

Web Title: sudhakar bhalerao career remains in focus due to factual decision
Next Stories
1 राजकीय कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला
2 धुळे जिल्ह्यात निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तप्त
3 संविधान दिनी कुठे जागृती फेरी तर, कुठे चर्चासत्र
Just Now!
X