वाठोडा लेआऊटमधील हमारी पाठशाला उच्च प्राथमिक विद्या मंदिर व कॉन्व्हेंटच्या उन्हाळी शिबिराचा समारोप डॉ. ज्ञानचंद ओस्तवाल, डॉ. नरेंद्र भुसारी, संस्था सचिव राजेंद्र नखाते, मुख्याध्यापिका वृषाली चंदनखेडे, ज्येष्ठ शिक्षिका गीता सोलव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
जीवनात यश-अपयश येतच असते. त्यामुळे एखाद्या कार्यात अपयश आल्यास घाबरू नका. मनात कोणताही न्युनगंड ठेवू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन यावेळी डॉ. नरेंद्र भुसारी यांनी केले. आज जे-जे नामांकित व्यक्तिमत्त्व आहेत, ते सर्व अपयशावर कठोर परिश्रमाने मात करून यशस्वी झाले आहेत. कठोर परिश्रम ही यशाची किल्ली आहे, असे ते म्हणाले. डॉ. ओस्तवाल यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शिबिरात चित्रकला, हस्तकला, संगीत, प्राणायाम, योगासन, नृत्य व संगणक प्रशिक्षणात सुमारे १५० विद्यार्थी सहभागी होते. यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी पालकांसमोर प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या हस्तपुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 यावेळी सर्व सहभागी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वृषाली डहाके यांनी केले. मुख्याध्यापिका वृषाली चंदनखेडे यांनी आभार मानले.