मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कारभार टर्मिनल-२ वरून सुरू झाल्यानंतर सुरू झालेला तस्करीचा सिलसिला अद्यापही थांबलेला नाही. सोन्याच्या तस्करीपासून ते अगदी अमली पदार्थाच्या तस्करीपर्यंत सर्वच प्रकारची तस्करी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी पकडली आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील प्रकरणे पाहता, शनिवार आणि रविवार हे दोन दिवस तस्करांच्या विशेष आवडीचे असल्याचे दिसते. मार्च महिन्यात जवळपास प्रत्येक सप्ताहान्ताला तस्करीची किमान तीन प्रकरणे पकडण्यात सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. मार्चमधील शेवटचा सप्ताहान्तही त्याला अपवाद ठरला नाही.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ वर बॅगेज तपासणीसाठी
अद्ययावत यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मात्र तरीही तस्करांचा वावर कमी झालेला नाही. किंबहुना १२ फेब्रुवारीला टर्मिनल-२वरून सर्व कारभार सुरू झाल्यानंतरच्या अवघ्या दीड महिन्यांत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी किमान ३० ते ३५ घटनांमध्ये तस्करांना सोने आणि अमली पदार्थ घेऊन मुंबईत प्रवेश करताना अटक केली आहे. यात ८ मार्चच्या शनिवारी तर सात तस्करांना ७ कोटींच्या मालासह अटक करण्यात आली होती. तर २५ मार्च रोजी मंगळवारी एकाच दिवशी १८ किलो सोने जप्त होण्याचा प्रकारही उघडकीस आला होता. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती.
गेल्या शनिवार व रविवार या दोन दिवसांत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी
केलेल्या कारवाईत तब्बल १.५० कोटींचा माल जप्त करण्यात आला. यात एक-एक किलो वजनाची सोन्याची चार कडी आणि एफ्रिडाइन हा अमली पदार्थ पकडण्यात आला. सोन्याच्या कडय़ांचीच किंमत एक कोटीपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. या सर्व तस्करीच्या घटनांत मुख्यत्त्वे दुबईहून मुंबईमार्गे केरळला जाणाऱ्या प्रवाशांकडे सोने मोठय़ा प्रमाणात सापडले आहे. तर अमली पदार्थाच्या तस्करीत आफ्रिकेतील देशांतूनयेणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याचेही सीमाशुल्क अधिकारी सांगतात. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बॅगेज तपासणीयंत्रणा आणि सुरक्षा तपासणी यंत्रणा आता अत्यंत अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या हातून हे तस्कर सुटणे अशक्य आहे. मुख्य म्हणजे आमच्या पथकातील श्वानही खूपच चांगली कामगिरी बजावत असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.