कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता अजित राऊत यांची, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मोहन यशवंत गोंजारी यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या निवडी पार पडल्या. याचवेळी लक्षवेधी ठरलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदी सचिन प्रल्हाद चव्हाण, परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, महिला बालकल्याण समिती सभापती रोहिणी प्रकाश काटे व उपसभापतिपदी लीला पांडुरंग धुमाळ यांचीही निवड करण्यात आली.
कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्ष यांची आघाडी आहे.आघाडीतील सूत्रानुसार महापौर, उपमहापौर तसेच विषय समितीचे सभापतीपद दोंन्ही काँग्रेसने दरवर्षी आलटून पालटून घेण्याचे ठरले आहे. १६ डिसेंबर रोजी मावळत्या महापौर प्रतिभा नाईकनवरे (काँग्रेस) व उपमहापौर परीक्षित पन्हाळकर (राष्ट्रवादी) यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. २७ डिसेंबर या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यादिवशी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, परिवहन समिती, महिला व बालकल्याण समिती सभापती पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे आजच्या सभेमध्ये निवड म्हणजे केवळ औपचारिकता उरली होती.     
महापालिकेतील राजर्षी शाहू सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विशेष साधारण सभेचे कामकाज जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यांच्याकडे प्रत्येक पदासाठी एकच अर्ज दाखल झाला होता.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम महापौर पदासाठी सुनीता राऊत व उपमहापौरपदासाठी मोहन गोंजारे यांची निवड जाहीर केली. राऊत या महापालिकेतील ४० व्या महापौर ठरल्या आहेत. तर गोंजारे हे उपमहापौरपद भूषविणारे ३८ वे नगरसेवक ठरले आहेत. या पाठोपाठ विषय समिती सभापतिपदांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. सभेचे कामकाज आटोपल्यानंतर माजी महापौर अ‍ॅड. श्यामराव शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर महापालिकेला सुट्टी जाहीर करण्यात आली.
श्रध्दांजली आणि मिरवणुकाही
महापालिकेत महापौर निवडीनंतर माजी महापौर अ‍ॅड.श्यामराव शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. माजी महापौरांनी केलेल्या कार्याचे स्मरण ठेवीत नगरसेवक तसेच नूतन पदाधिकाऱ्यांनी शिस्तीचे भान ठेवणे गरजेचे होते. मात्र कधी नव्हे ती पदाची लॉटरी लागल्याच्या खुशीत पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांना प्रसंगाचे औचित्य ठेवता आले नाही. श्रध्दांजली वाहून काही क्षण लोटतात तोवर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी सवाद्य मिरवणुका काढल्या आणि नूतन पदाधिकारीही लोकांचे हार गळ्यात मिरवत मिरवणुकांमध्ये खुशीने सहभागी झाले, याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती.