कादवा साखर कारखान्यास शासनाने केवळ एक वर्षांचा कर माफ केला तरी हमी भाव देणे शक्य होईल, अशी अपेक्षा कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्य़ात सहकारी तत्वावर सुरू असलेला सद्यस्थितीतील एकमेव साखर कारखाना अशी ओळख निर्माण झालेल्या दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर उपाध्यक्षपदी उत्तमबाबा भालेराव यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलीे. त्यानंतर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी गैरव्यवहार, पैशांची उधळपट्टी यांसह इतर विविध कारणांमुळे मान टाकली असताना कादवा कारखान्यास नुकसानीतून बाहेर काढण्यात शेटे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळास यश आले. त्याचेच फळ म्हणून नुकत्चाय झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी पुन्हा एकदा शेटे यांच्यावर विश्र्वास टाकला. संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे शेटे आणि भालेराव यांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यानंतर सभासदांचा आभार मेळावा होऊन त्यात नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम शेटे यांनी साखरेचे भाव जरी कोसळले तरी शासनाने उसाला हमी भाव जाहीर केला असल्याने तो देणे कारखाना व शासनाची संयुक्त जबाबदारी असल्याचे नमूद केले. शासनाला याबाबत भूमिका घ्यावी लागणार असून कादवाने यापूर्वीही हमी भावापेक्षा अधिक भाव दिला असून शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. कारखान्याच्या हितासाठी सर्व सभासदांनी ऊस लागवड करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यापूर्वीही साखर कारखाने अनेक वेळा अडचणीत आले असताना शरद पवार यांनी वारंवार शासकीय मदत मिळवून कारखाने व शेतकऱ्यांना मदत केली असून भाजप सरकारलाही कारखान्यांना मदत करावी लागणार आहे. सभासदांनी आपले काम पाहून आपल्याला पुन्हा संधी देत आमच्यावर जबाबदारी टाकली आहे. या जबाबदारीची जाणीव असून सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आम्हाला ऊस लागवडीच्या माध्यमातून सभासदांच्या मदतीची गरज असून सभासदांनी ऊस लागवड करून सहकार्य करावे असेही शेटे यांनी सांगितले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थापक संचालक भाऊ पाटील-वडजे होते. यावेळी उपाध्यक्ष भालेराव यांच्यासह बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, संस्थापक संचालक किसनलाल बोरा आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2015 रोजी प्रकाशित
..तर उसाला हमी भाव देणे शक्य
कादवा साखर कारखान्यास शासनाने केवळ एक वर्षांचा कर माफ केला तरी हमी भाव देणे शक्य होईल, अशी अपेक्षा कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी व्यक्त केली.
First published on: 10-04-2015 at 12:05 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Support price for sugarcane possible if government rebate one year tax to kadwa sugar factory