गडचिरोलीत काँग्रेसच्या प्रचारात सक्रीय झालेले राष्ट्रवादीचे नेते चंद्रपुरात मात्र विभागले गेले असून काहींनी आपचा झाडू हाती घेतल्याने या सर्वाची समजूत अजित पवारांनी काढावी, असा आग्रह काँग्रेसच्या वर्तुळातून धरला जात आहे.
पूर्व विदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीने गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या तीन लोकसभा मतदारसंघांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. या तीनही ठिकाणी आघाडीत बिघाडी निर्माण होऊ नये, यासाठी आरंभापासून वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. या तीनही मतदारसंघात काँग्रेसने नवीन उमेदवार दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्रपणे प्रचारात सहभागी व्हावे, असे निर्देश वरिष्ठांकडून असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याने आता दिलजमाईसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचे सर्व नेते काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. प्रारंभी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये थोडा नाराजीचा सूर होता. गडचिरोलीची जबाबदारी अंगावर घेतलेले चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांची शिष्टाई सफल ठरली व धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सर्व प्रमुख नेते प्रचारात सहभागी झाले आहेत.
या लोकसभा मतदारसंघातील अहेरी व ब्रम्हपुरी या दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा चांगला प्रभाव आहे. शिवाय, गडचिरोली जिल्हा परिषदेची सत्ताही  राष्ट्रवादीच्या हातात आहे. डॉ. उसेंडी यांच्यासमोर यावेळी पक्षातील नाराज नेत्यांना सांभाळण्यासोबतच राष्ट्रवादीला सक्रीय करण्याचे आव्हान होते. त्यांच्या वतीने वडेट्टीवारांनी जिल्ह्य़ातील सावकार गटाला सक्रीय करतांनाच राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेतल्याने येथे काँग्रेसच्या प्रचारात नेते एकदिलाने सहभागी झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. चंद्रपुरात मात्र संजय देवतळे यांचा प्रचार करण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी विभागली गेली आहे. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व त्यांचे काही सहकारी देवतळे यांच्यासोबत प्रचारात सक्रीय झाले असले तरी अनेक बडे नेते मात्र आपचा प्रचार करत असल्याने काँग्रेसच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. वरोऱ्यात अ‍ॅड. मोरेश्वर टेंभुर्डे, राजुऱ्यात सुदर्शन निमकर या दोन नेत्यांनी काँग्रेसला विरोध करत आपचे वामनराव चटप यांची बाजू घेतली आहे. त्यांचे कार्यकर्तेही आपच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. शिवाय, सहकार क्षेत्रातील नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडेही आपच्या प्रचारात सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीच्या या नेत्यांची समजूत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच काढावी, असा आग्रह काँग्रेसच्या वर्तुळातून धरला जात आहे. विशेष म्हणजे, प्रचाराला सुरुवात होण्याच्या आधीच अजित पवार यांनी अमरावतीत आले असताना आपचा प्रचार करणाऱ्या या नेत्यांना दूरध्वनी करून काँग्रेसच्या प्रचारात सहभागी व्हा, असे निर्देश दिले होते. तरीही या नेत्यांनी न ऐकल्याने आता पवारांनी येथे येऊन या नेत्यांची समजूत काढावी, अशी विनंती काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.
संजय देवतळे व डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या, मंगळवारी या दोन जिल्ह्य़ात येणार आहेत. सकाळी ते अहेरीला जाहीरसभा घेणार असून दुपारी चंद्रपूर व वरोरा येथील प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. या दोन सभांमधून ते दारूबंदीची घोषणा करणार असल्याचा दावा काँग्रेसच्या वर्तुळातून केला जात आहे.