छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वार्थाने आंतरराष्ट्रीय आणि सुसज्ज विमानतळांच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या टर्मिनल-२ चे उद्घाटन शुक्रवारी होत आहे. या टर्मिनल-२ बद्दल अनेक प्रवाशांनाच नाही, तर सामान्यांनाही प्रचंड कुतूहल आहे. सध्याच्या विमानतळाच्या परिसरात चाललेले अवाढव्य बांधकाम विमानतळावरून दूर देशी जाणाऱ्या आणि त्यांना सोडायला येणाऱ्या बहुतेकांनी पाहिले आहे. पण बाहेरच्या भिंतींच्या आत नेमके काय आहे त्याची ही झलक
काही महत्त्वाच्या सुविधा
– पश्चिम द्रुतगती महामार्गापासून सहापदरी उन्नत रस्ता टर्मिनल-२ ला जोडण्यात आला आहे. या मार्गावरूनच टर्मिनल-२ मधील बहुतांश प्रवासी मार्गस्थ होणार आहेत. हा रस्ता प्रवाशांना टर्मिनल-२च्या चौथ्या मजल्यावर आणून सोडेल. सध्या नेहमीच्या मार्गाने विमानतळावर येण्यासाठी ३.८ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. हे अंतर आता ५०० मीटरने कमी होणार आहे.
– भारतातील पहिल्या ‘एनर्जी एफिशिएण्ट ऑटोमेटेड एलएस-४०००ई टिल्ट ट्रे’ने सुसज्ज असलेली बॅगेज हाताळणी व्यवस्था. या व्यवस्थेमुळे तासाला ९६०० बॅग्ज हाताळल्या जातील. ही क्षमता ताशी १०,८०० एवढी वाढवता येणार आहे.
– आगमन झालेल्या प्रवाशांना त्यांचे सामान त्वरित मिळवण्यासाठी टर्मिनल-२च्या आगमन कक्षात १० बॅगेज कन्वेअर बेल्ट आहेत.
– टर्मिनल-२मध्ये ८० वेगवेगळ्या प्रकारांची ७७ हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे हे देशातील सर्वात मोठे ग्रीन एअरपोर्टही ठरणार आहे.
* एकूण क्षेत्रफळ – ४,३९,२०३ चौ.मी.
* प्रवासी वाहन क्षमता – प्रतिवर्ष ४ कोटी
* चेक इन काउंटर – १८८
* डिपार्चर इमिग्रेशन काउंटर – ६०
* अरायव्हल इमिग्रेशन काउंटर – ७२
* सुरक्षा तपासणी नाके – १२४
* पॅसेंजर बोर्डिग ब्रिज – ५२
* सरकते पट्टे – ४४
* सरकते जिने – ४९
* एलिव्हेटर्स – ७३
* प्रसाधनगृहे – १०१
* वाहतनळ क्षमता – ५००० वाहने
*  सीसीटीव्ही कॅमेरे – २३००
*  सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली  – ४१००