ठाण्यातील भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद पाटणकर यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा जबरदस्तीने घेण्यात आल्यामुळे या पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक रद्द करावी, तसेच विद्यमान उपमहापौर मुकेश मोकाशी यांच्याकडून पदाचा अधिकार काढून घेण्याचे आदेश द्यावेत, अशा मागणीची याचिका अलर्ट सिटिझन या संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच पाटणकर प्रकरणाचा तपास ठरावीक मुदतीत पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेमुळे ठाण्याचे उपमहापौरपद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
टीएमटी सभापतीपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर फोडत शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मिलिंद पाटणकर यांना मारहाण करून त्यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला होता. या घटनेनंतर पाटणकर बेपत्ता झाले होते. पाटणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने माघार घेतल्याने भाजपचे मुकेश मोकाशी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. दरम्यान, पाटणकर यांनी ठाण्यात पुन्हा येताच स्वपक्षातील स्थानिक नेत्यांवर आरोप केले. तसेच जबरदस्तीने राजीनामा घेऊन अपहरण केल्याची तक्रारही नौपाडा पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सूरू आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते अडचणीत आले आहेत. असे असतानाच अलर्ट सिटिझन या संस्थेने उपमहापौरपदासाठी घेण्यात आलेली निवडणूक रद्द करण्यासंबंधीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पाटणकर यांचा जबरदस्तीने राजीनामा घेण्यात आला आहे.
तसेच पाटणकर बेपत्ता असतानाही त्यांची पुन्हा परतण्याची वाट पाहण्यात आली नाही आणि राजकीय दबावापोटी उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे. विद्यमान उपमहापौर मुकेश मोकाशी यांच्याकडून पदाचे अधिकार काढून घेण्याचे तसेच त्यांना उपमहापौरपदाच्या कोणत्याही सवलती देण्यात येऊ नयेत, यासंबंधी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद नेने यांनी दिली. पाटणकर प्रकरणाचा तपास ठरावीक मुदतीत पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.