जनतेचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या शहराजवळील दसाने व लोणवाडे शिवारांतील तिन्ही वादग्रस्त हड्डी कारखान्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने अखेर खंडित केला. राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, असा आग्रह धरणारे निवेदन ग्रामस्थांनी कंपनीला दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हाडांच्या या कारखान्यांमध्ये प्रक्रिया केली जाते तसेच तेथील आवारात मोठय़ा प्रमाणावर हाडे साठविली जातात. त्यामुळे लोणवाडे, दसाने, खडकी, सायने आदी परिसरांतील गावांमध्ये दरुगधी निर्माण होते. त्यामुळे रोगराई वाढल्याने त्रस्त झालेले गावकरी या कारखान्यांना सातत्याने विरोध करीत होते. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानुसार या कारखान्यांकडून प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे मान्य करत याविषयी कारवाई करण्याचे निर्देश शासनपातळीवर दिले गेले. मात्र प्रत्यक्षात कारखाने बंद करण्यात प्रशासकीय यंत्रणा टाळाटाळ करीत होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. अलीकडेच आमदार दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला हे कारखाने बंद करण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला होता.
या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे कारखाने बंद करण्यासंदर्भात गेल्या आठवडय़ात आदेश दिले होते. तथापि या आदेशाची पुन्हा पायमल्ली करत
हे कारखाने सुरूच राहिले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गळ घातली. त्यानंतर चक्रे फिरून हाडांच्या कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.