वाशीम येथून अमरावतीकडे परत येणाऱ्या ‘एसीबी’च्या वाहनाला कामरगावजवळ बुधवारी पहाटे झालेल्या अपघातासाठी झाडांची अमानुषतेने तोड करणारी टोळी कारणीभूत ठरली आहे. या अपघातात सहा पोलिसांचा दुर्दैवी बळी गेला. या अपघातामुळे रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या मोठय़ा झाडांचे बुंधे पेटवून देत लाकूडतोड करण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पथक वाशीम जिल्ह्यातील लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई आटोपून अमरावतीत परतत असताना कारंजा ते अमरावती मार्गावर कामरगावजवळ या पथकाच्या टाटासुमोला भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन पोलीस निरीक्षकांसह ‘एसीबी’च्या सहा पोलिसांचा मृत्यू झाला. हे पथक  कामरगावनजीक पोहोचले असताना पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वाहनासमोर अचानकपणे मोठे झाड कोसळले, त्यामुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित झाले. नियंत्रण सुटल्याने टाटा सुमो विजेच्या खांबावर आणि नंतर झाडांवर आदळली, अपघातात टाटा सुमो चक्काचूर झाली, असा घटनाक्रम समोर आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून लाकूडतोडय़ांची टोळी राज्य महामार्गावर कार्यरत झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांपैकी मोठे झाड बुंध्याजवळ पेटवून द्यायचे आणि ते आतून हळूहळू जळून कोसळल्यानंतर लाकूड कापून न्यायचे ही या लाकूडतोडय़ांची कार्यपद्धती आहे. या तस्करांनी गेल्या काही वर्षांत अमरावती परतवाडा मार्गावर उच्छाद घातला होता. या मार्गावरील दुतर्फा असलेली मोठी कडूनिंबाची झाडे अशाच पद्धतीने तोडली गेली आणि हिरवागार असलेला या मार्गावरील काही भाग बोडका झाला. आता या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना झाडांची सावली मिळत नाही. इतरही राज्य मार्ग या टोळीच्या निशाण्यावर
आहेत.
मोठी झाडे तोडण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयोगी पडते. वृक्षाच्या बुंध्याशी कोळसे पेटवून दिल्यानंतर खोडाचा भाग हळूहळू जळतो आणि एक-दोन दिवसात झाड कोसळून पडते. लोकांनाही संशय येत नाही, झाड नैसर्गिकरीत्या जळाले असावे, असे समजून कुणी त्याकडे लक्ष देत नाही आणि याच संधीचा फायदा लाकूड तस्कर घेतात. रातोरात कोसळलेल्या झाडाची विल्हेवाट लावली जाते.
कामरगावनजीक झालेल्या अपघातासाठी असेच एक पेटते झाड कारणीभूत ठरले आहे. वाशीम पोलिसांनी अज्ञात लाकूडतोडय़ांच्या विरोधात गुन्हा देखील नोंदवला आहे, पण अशा प्रकरणांमध्ये आरोपींना हुडकून काढणे कठीण आहे. वृक्ष तोडणे हा गंभीर गुन्हा मानला जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला तर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या झाडांचे सोयरेसुतक नाही. वनविभागाच्या हद्दीत नसल्याने त्यांच्याकडून कारवाईचा प्रश्न नाही. पर्यावरणप्रेमी अधूनमधून आवाज उठवतात, पण त्यांचे म्हणणे सरकारी यंत्रणा गांभिर्याने घेत नाही. अशा स्थितीत वृक्षतोडीचा हा विषय अत्यंत गंभीर वळणावर पोहचला आहे. अशा प्रकरणांमध्ये अपघातांची भीती सातत्याने व्यक्त केली जात होती. बुधवारच्या अपघाताने ही भीती खरी ठरवली आहे.