आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वागीण विकासाकरिता आदिवासी विकास विभागातर्फे नागपूर व अमरावती विभागात चालवल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी देशभर साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून नागपूर आदिवासी विकास विभागातर्फे  ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत होते. प्रतिकूल परिस्थितीत आश्रमशाळेतून शिक्षण देत असलेल्या शिक्षकांचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले. शिक्षण माणसाचा तिसरा डोळा असून आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात पुढे येणे गरजेचे असल्याचे अध्यक्षीय भाषणातून गावीत यांनी सांगितले. आश्रमशाळेतील विषय शिक्षकांचा तसेच अनुसूचित जमातीमधून नागपूर शिक्षण मंडळाच्या शालांत व उच्च शालांत परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, विशेष अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच उच्च शिक्षणासाठी विशेष शिकवणी वर्ग विद्यापीठाने सुरू केले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूरच्या आदिवासी विकास अपर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी केले. आभार चिमूरचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी मानले. याप्रसंगी अमरावतीचे आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर वाळींबे, प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे, नागपूरचे आदिवासी विकास उपायुक्त विनोद पाटील तसेच नागपूर व अमरावती विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.