‘मराठी’ मुंबईत मध्य किंवा पश्चिम रेल्वेच्या स्थानकांच्या यादीत मात्र मराठीची चिरफाड होत आहे. ही यादी नेमकी कोणत्या भाषेत केली आहे, हे वाचून तरी स्पष्ट होत नाही. काही स्थानकांची नावे शुद्ध मराठीत लिहिली असली, तरीही अनेक स्थानकांच्या बाबतीत ‘हिंदी की मराठी’ या द्विधेत रेल्वे प्रशासन अडकले की काय, अशी शंका येते. विशेष म्हणजे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि मुख्य वाणिज्य अधिकारी हे मराठीच असावेत, असा आग्रह धरणाऱ्या काही अस्मितावादी पक्षांनीही या गोष्टीकडे काणाडोळा केला आहे.
रेल्वेच्या उपनगरीय तिकीट केंद्रांजवळ उपनगरीय रेल्वेस्थानकांची नावे आणि मार्ग असलेला एक नकाशा लावला आहे. या नकाशातील काही स्थानकांची नावे वाचून केवळ मनोरंजन आणि संताप या दोनच भावना मनात येतात. रेल्वेने हिंदी व मराठी या दोन्ही भाषांना अजिबात दुखवायचे नाही, असे ठरवले आहे की काय, अशी शंकाही ही यादी वाचून येते. कारण कल्याण, घणसोली अशा स्थानकांचा उल्लेख शुद्ध मराठीत करताना रेल्वे प्रशासनाने ठाण्याचे थाने, शहाडचे शहद, आंबिवलीचे अम्बावली, खडवलीचे खडावली, खर्डीचे खडी, लवजीचे लॉजी अशी चिरफाड केली  आहे.
काही प्रवाशांना याबाबत विचारले असता, हा मुद्दा भाषिक अभिमानाचा नसल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या स्थानकाचा उच्चार त्या शहरात राहणारे बहुसंख्य लोक कसा करतात, याचा विचार करूनच रेल्वेने हा तक्ता लावायला हवा होता, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वेने दोन्ही भाषांची सरमिसळ करू नये, असे काहींचे म्हणणे आहे. रेल्वेने कोलकाता किंवा बेंगळुरू अशा शहरांचा उल्लेख त्या-त्या राज्यांमध्ये कलकत्ता किंवा बँगलोर असा करून दाखवावा, असे थेट आव्हानही काहींनी रेल्वेला दिले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी व मुख्य वाणिज्य अधिकारी हे प्रामुख्याने मराठीच असावेत, असा आग्रह काही दिवसांपूर्वी मुंबईतील मराठी अस्मितावादी पक्षांनी धरला होता. मात्र या पक्षांनाही रेल्वेच्या या तक्त्यातील चुका आणि त्या चुकांचे गांभीर्य कळू नये, ही आश्चर्याची बाब आहे, असे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले. याबाबत शिवसेना किंवा मनसे या पक्षांच्या संबंधित नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.