सर्वाच्या कल्याणासाठी आपण काही करू शकलो नाही तरी किमान तसा विचार आपल्या बरोबर असणे गरजेचे आहे. विचारांची मजबुतीच तुम्हाला जीवनात कायम उपयोगी पडते, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
लातूर अर्बन को-ऑप. बँकेच्या लातूर शहरातील कापड लाइन व अंबाजोगाई रस्ता या दोन शाखांचे उद्घाटन चाकूरकर यांच्या झाले. त्यानंतर प्रियदर्शनी बालग्राम येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. आमदार दिलीपराव देशमुख, बसवराज पाटील, अमित देशमुख, बाबासाहेब पाटील व वैजनाथ शिंदे, महापौर स्मिता खानापुरे यांची उपस्थिती होती.
चाकूरकर म्हणाले, की चांगल्या कामाचे सातत्य टिकले पाहिजे. एखादे काम सातत्याने केले, तरच प्रगतीला वाव असतो. धरसोड वृत्तीमुळे अडथळे निर्माण होतात. लोकशाहीत सर्वाच्या उन्नतीसाठीचे काम अभिप्रेत आहे. सर्वाचा विचार केला गेल्यास मिळणारे यश टिकणारे असेल अन्यथा तात्कालीक यश मिळेल. जुन्या-नव्याचा समन्वय साधून समाजहिताचे आहे ते अंगीकारले पाहिजे. यशवंतराव चव्हाणांनी सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे बेरजेचे राजकारण केले. कारण त्यांच्या विचारांवर पंडित नेहरूंच्या विचारांचा पगडा होता. पंडितजींनी पक्षनेतृत्वाला आपण देशाचे पंतप्रधान आहोत, पक्षाचे नाहीत असे सांगितले होते. हा विचारच देशाला पुढे नेणारा आहे. लातूर अर्बन बँकेने आपल्या कामातून समाजहित साधावे.
पालकमंत्री पाटील, आमदार दिलीपराव देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी यांनी बँकेने गेल्या १७ वर्षांत केलेल्या प्रगतीची माहिती दिली. बनावट नोटांचा प्रश्न अतिशय गंभीर असल्याचे प्रदीप राठी यांनी सांगितले. अधिकाधिक व्यवहार बँकांमार्फतच केले जावेत, असे मत त्यांनी मांडले. प्रदीप राठी म्हणजे कल्पकतेची बँक असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी नमूद केले. चाकूरकर यांचा मोगऱ्याच्या फुलांची शाल पांघरून सत्कार करण्यात आला. फुलांच्या सुगंधाप्रमाणेच त्यांच्या विचारांचा सुगंध लोकांत पसरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन रामानूज रांदड यांनी केले. ललितभाई शहा यांनी आभार मानले.