‘मतदान करा मतदान’ असे निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम चालविली असली तरी आयोगाच्या गलथानपणाचा फटका रा.स्व.संघाचे माजी अ. भा. बौध्दिक प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार मा.गो. वैद्य व राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे आदींसह नागपुरातील हजारो नागरिकांना बसल्याने  त्यांना मतदानास मुकावे लागले. नागपुरात हनुमाननगरातील मतदान केंद्रावर भाजप व निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विदर्भातील सर्वच मतदारसंघात हीच परिस्थिती होती.
निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात देशभरात मतदान जागृती मोहीम चालविली. याआधी तीन महिन्यांपूर्वीही अशीच मोहीम झाली. मात्र, प्रत्यक्षात आज मतदान झाले तेव्हा हजारो मतदारांना त्यांची नावे यादीतून गायब असल्याचे आढळले. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. ज्येष्ठ पत्रकार मा.गौ. वैद्य व राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांनी याआधीही मतदान केले आहे. त्यामुळे ते निश्चिंत होते. आज ते मतदानासाठी केंद्रावर गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांची नावे यादीत नव्हती. मा.गो. वैद्य आधी काँग्रेसनगरात रहात होते. मुलासह ते तेथे गेले. तेथे त्यांचे नाव नव्हते. जयप्रकाशनगरच्या यादीतही नव्हते.
हनुमान नगरातील महापालिका शाळेसभोवतालच्या शेकडो नागरिकांची नावे मतदार यादीत नव्हती. नासुप्र कार्यालय ते तुकडोजी पुतळा या रस्त्यावरील हनुमाननगरातील घरांमधीलही अनेक नावे यादीत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक तरुण मतदारांची नावे लाल शाईने खोडलेली होती. हे तरुण हनुमाननगरातील महापालिका शाळेतील केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांना मतदानापासून अधिकाऱ्यांनी परावृत्त केले. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. या तरुणांजवळ ओळखपत्रे असूनही अधिकाऱ्यांनी मतदान करू देण्यास नकार दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. माजी आमदार अशोक मानकर तेथे पोहोचले. अधिकाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे तेथे चांगलीच खडाजंगी झाली. हा वाद जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. मतदार यादीत नाव असल्याने मतदान करण्यास त्यांनी परवानगी दिल्याने मतदान तेथे सुरळीत सुरू झाले.
बिंझाणी सिटी महाविद्यालयासह नागपुरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. हजारो नागरिकांची नावे यादीत नव्हती पण ओळखपत्रे असल्याने मतदार अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. अनेक ठिकाणी तणावाची स्थिती होती. अमरावतीमधील एका भागातील सहा हजार नावे बेपत्ता होती. अनेक ठिकाणी नावे होती पण छायाचित्र दुसऱ्याचेच होते. पती तसेच वडलांची नावे दुसरीच होती. नावांमध्ये अनेक ठिकाणी घोळ होता. निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे मतदारांना फटका बसला. त्यांना मतदान न करता आल्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली.