कळंबोली शहरामध्ये रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या बेकायदा पार्किंग प्रश्नावर नवी मुंबईच्या वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंगचे उत्तर शोधले आहे. नागरिक, व्यापाऱ्यांना या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल हरकती नोंदविण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. वाहतूक उपायुक्त कार्यालय, कोकण भवन, सातवा मजला, खोली क्रमांक ७३२ येथे हरकती नोंदविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायन-पनवेल मार्गावरील कळंबोली शहराच्या प्रवेशद्वारावरून शिवसेना शाखा ते सुधागड विद्यालयाची नवीन इमारत ते पोलीस निवारा (चौकी) इथपर्यंत ही सम-विषम पार्किंग जाहीर होणार आहे. दुचाकीस्वारांनी आपली दुचाकी पार्किंग करताना ४५ अंशाच्या कोनामध्ये पार्क करणे बंधनकारक राहील. तसेच शहरात व्यापाऱ्यांना माल पुरवठा करणाऱ्या गुड्स कॅरिअर वाहनांना रात्री १० ते सकाळी आठ वाजेपर्यंत रस्त्यावर वाहने उभे करून आपला माल घेता येणार आहे. या व्यतिरिक्त अन्य वेळेत रस्त्यावर जड, अवजड वाहनांना उभे करण्यास मनाई असणार आहे.
वाहतूक विभागाने कळंबोलीतील वाहनचालकांना नियमनाच्या चकाटय़ात बसविण्यासाठी दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारचा प्रयत्न केला होता. त्या वेळी शहराचे पार्किंग सम-विषम होऊ शकले नाही.