पाच दिवसांपूर्वी उद्घाटनाचा बार उडवून दिलेल्या एमएमआरडीएच्या महापे येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंस सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याचे आढळून आले आहे. पूर्व बाजूस एलअ‍ॅण्डटी कंपनीजवळ सुरू असलेले रस्त्याचे रुंदीकरण आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलाखालील सिग्नल यामुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शीळ फाटा मार्गावरील सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर २०-२५ दिवसांत ही वाहतूक कोंडी सुरळीत होणार आहे, पण एमआयडीसी भागात ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे ही अडचण कायमस्वरूपी आहे. त्यावर उपाय म्हणून या ठिकाणीही एमएमआरडीए एक दुसरा उड्डाणपूल बांधणार आहे.

महापे-शीळ फाटा मार्ग आता वर्दळीचा झाला आहे. उरण, गोव्याकडे जाणारी बहुतांशी सर्व वाहने या मार्गावरून प्रवास करीत आहेत. त्याचप्रमाणे मुंब्रा, कल्याण, डोंबिवली या वाढत्या नागरीकरणाकडे ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात महापे येथे होणारी वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात या मार्गावर वाहनांना करावा लागणारा द्राविडी प्राणायाम यामुळे एमएमआरडीएने ७१ कोटी रुपये खर्च करून एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा उड्डाणपूल तीन वर्षांत बांधला आहे. दोन महिने त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने मागील गुरुवारी त्याच्या उद्घाटनाचे सोपस्कर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आटोपण्यात आले. त्यानंतर या मार्गावरून वाहनांची सुसाट वाहतूक सुरू झाली आहे.
या उड्डाणपुलावरून दिवसाला ३५ हजार वाहने ये-जा करीत असल्याचे समजते. त्यामुळे काही क्षणात उड्डाणपूल पार करणाऱ्या वाहनांची गाडी सकाळ-संध्याकाळ एलअ‍ॅण्डटीच्या वळणावर तसेच पलीकडे ठाणे-बेलापूर मार्गावर अडत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीवरून येणाऱ्या वाहनांनी एमआयडीसीत वळण घेतल्यास वाहतूक कोंडी हमखास मानली जात आहे. पण यावर लवकरच तोडगा निघण्याची आशा वाहतूक पोलिसांना आहे. यात एमएमआरडीएने केलेली महत्त्वाची आणि लक्षवेधी चूक म्हणजे या उड्डाणपुलाची लांबी अजून एक किलोमीटर वाढवून ती एलअ‍ॅण्डटीजवळील पेट्रोल पंपापर्यंत नेली असती तर ही होणारी वाहतूक कोंडी टाळता आली असती असे वाहनचालकांचे मत आहे. पण यावर तोडगा म्हणून उड्डाणपुलाच्या पुढे आणखी एक उड्डाणपूल बांधला जाणार आहे.

नवीन उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूस सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असून शीळ फाटा मार्गावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्याची एक मार्गिका पूर्ण झाली असून ती वाहतुकीस लवकरच खुली केली जाणार आहे. एमआयडीसीत वळणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी थोडीफार वाहतूक कोंडी कायम राहणार आहे.
संजीव कांबळे, वाहतूक पोलीस निरीक्षक, महापे