मुंबईचे काँक्रीटीकरण आता इथल्या वृक्षसंपदेच्याही ‘मुळावर’ येऊ लागले आहे. मुंबईच्या रस्त्यांचेही काँक्रीटीकरण होऊ लागल्याने झाडांच्या मुळांना धरायला मातीच नसणे, पावसाळ्यापूर्वी अशास्त्रीय पद्धतीने झाडांच्या फांद्यांची करण्यात आलेली कत्तल यामुळे मुंबईतील वृक्षसंपदेची घुसमट होते आहेच. त्यात आता राजस्थानातील वादळसदृश्य स्थितीमुळे शहरात सुटलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्याची भर पडून यंदा कधी नव्हे ते तब्बल दीड हजार झाडांचा बळी पडला आहे.

अपुऱ्या मातीत, काँक्रीटमुळे श्वास घुसमटलेल्या अवस्थेत रस्त्याकडेला जीव मुठीत धरून उभ्या असणारी दीड हजारावर झाडे वादळवाऱ्यांच्या फटकाऱ्यात कोलमडली आहेत. त्यामुळे आठ जणांचा मृत्यूही ओढवला आहे. पावसाळ्यापूर्वी शास्त्रीय पद्धती न वापरता केलेली फांदीतोड आणि झाडांना मूळ पसरवण्यासाठी शिल्लकच नसलेली माती यासाठी जबाबदार असल्याचे वृक्षतज्ज्ञांचे मत आहे.

झाडे पडल्याच्या तक्रारी
१९ जून – १२३
२० जून – ८५
२१ जून – ८९
२२ जून – १३७
२३ जून – २४४
२४ जून – ४०
२५ जून – ३३
२८ जुलै – ८५
२९ जुलै ५१

हे पालिकेचे कृत्य
पावसाच्या पाण्यामुळे झाडांच्या फांद्यांचे वजन वाढते. त्यामुळे त्या तुटतात. तसेच रस्त्याकडेच्या झाडांना मुळे पसरण्यासाठी पुरेशी जागाच मिळत नाही. उखडलेल्या झाडांच्या मुळांचा आकार अगदीच कमी असतो. त्यांना मातीत घट्ट पकड घेता येत नसल्याने ती पडतात, असे उद्यान विभागाचे सहआयुक्त शांताराम शिंदे यांनी सांगितले. परंतु, झाडांना मुळे व्यवस्थित पसरू न देण्यास पालिकाच कारणीभूत आहे. झाडे कुठे लावावीत, शेजारी गटार आहे का, मातीचा पोत कोणता आहे, मूळ पसरू शकेल का, माती जास्त नसताना नेमकी कोणती झाडे निवडावीत याबाबत कोणताही सारासार विचार न करताच खड्डा खणून वृक्षारोपण केले जाते. त्याचे परिणाम वादळवाऱ्यात दिसतात, असे वृक्षतज्ज्ञ चंद्रकांत लट्टू म्हणाले.
पर्णसांभाराचा तोलच बिघडतो अन्..
बेभान वाऱ्यात झाडे किंवा फांद्या तुटणे ही तशी सर्वसामान्य घटना आहे. मात्र रस्त्याकडेला पडत असलेल्या झाडांची संख्या दीड हजारांवर पोहोचल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात फांद्या पडून होणारी जीवित किंवा मालमत्ता हानी रोखण्यासाठी दर पावसाळ्याआधी पालिकेच्या उद्यान विभागाकडून वृक्ष छाटणी करण्यात येते. मात्र या वृक्षछाटणीबाबत गेली अनेक वर्षे वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त होते. वृक्षछाटणीच्या नावाखाली फक्त रस्त्यावरील फांद्या तोडल्या जातात. यामुळे झाडाच्या पर्णसांभाराचा तोलच बिघडतो. एका बाजूला फांद्याचे वजन अधिक झाल्याने कमी वाऱ्यातही झाड पडण्याची शक्यता वाढते. दरवर्षी होत असलेल्या या आरोपांमुळे पालिकेने यावर्षी वृक्षछाटणीचे काम कंत्राटदाराला दिले. आतापर्यंत किमान उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली माळी हे काम करत. मात्र लाकूड विकून नफा कमवण्याचा विचार असलेल्या कंत्राटदाराकडे काम गेल्याने जास्तीत जास्त फांद्या कापून झाडांचे अधिक नुकसान केले गेले, असा आरोप वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य निरंजन शेट्टी यांनी केला. शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षगणना करताना त्यात झाडांचे आरोग्यही पाहायला हवे. त्यानुसार वृक्षछाटणी किंवा लहान मुळे- पुरेशी माती नसलेल्या झाडांची काळजी घ्यायला हवी. मात्र वृक्षगणनेवर कोटय़वधी रुपये खर्च करूनही त्याचा उपयोग होत नाही, असेही शेट्टी म्हणाले.