विदर्भातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचा विषय प्राधान्यक्रमावर घेण्यात आला असून अनेक मार्ग सिमेंट काँक्रिटचे करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना दिली.
खाजगी कामासाठी येथे आलेल्या गडकरी यांनी विश्रामगृहावर वार्ताहरांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील रस्ते सुधारणांचा विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मोटर व्हेईकल अ‍ॅक्टमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून अमेरिका, जपान, कॅनडा यासारख्या प्रगत राष्ट्रांमधील मोटार वाहन कायद्यांचा अभ्यास करून त्यातील चांगल्या तरतुदींचा अंतर्भाव नव्या कायद्यात करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात नवीन कायद्याच्या मांडणीची प्रक्रिया सुरू होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
चिखलदरा येथील उदंचन जलविद्युत प्रकल्पाला दशकभरापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. हा प्रकल्प सुरू करण्याच्या संदर्भात हालचाली करण्यात येणार आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ संशोधन प्रयोगशाळेतून संत्र्याच्या कलमा प्रमाणित करून घेण्याच्या संदर्भात कृषीमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्याचा फायदा मोर्शी, वरूड, काटोल आणि इतर भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकेल. संत्रापट्टय़ात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय चिंताजनक आहे. या भागात जलसंधारणाच्या प्रभावी योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.