रेल्वे तिकिटांचे आरक्षण करून देणाऱ्या वांद्रे येथील दोन अधिकृत एजंटांना रेल्वे बोर्डाने काळ्या यादीत टाकले आहे. या दोन्ही कंपन्या आयआरसीटीसीच्या एजंट असून त्यांना इ-तिकिटाचे आरक्षण देण्याचे परवाने देण्यात आले होते. इ-तिकिटांचे आरक्षण करतानाच या दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी तिकीटांचा काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी आल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
खेरवाडी पालिका वसाहतीमधील ‘गुप्ता टूर्स’ आणि ‘आदिती टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ या कंपन्यांना यापुढे तिकीट आरक्षण करता येणार नाही, असे रेल्वे बोर्डाने जाहीर केले आहे. या दोन्ही कंपन्या इ-तिकीटाद्वारे प्रवाशांना आरक्षण करून देत असत. या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी बनावट नावांनी इ-तिकीटे काढली होती. ही तिकीटे नंतर दुसऱ्या प्रवाशांना विकण्यात आली होती. या प्रकरणाची तक्रार झाल्यावर संबंधित तिकीटे कोणत्या कंपन्यांनी आरक्षित केली होती, याचा तपास करण्यात आला होता. यापैकी गुप्ता टूर्स कंपनीसंदर्भात एका लोकप्रतिनिधीनेही रेल्वे बोर्डाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारींची शहानिशा केल्यावर रेल्वे बोर्डाने या दोन्ही कंपन्यांची परवानगी रद्द केली.