चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच एकाच वेळी बंद पडल्याने वीज उत्पादनात घट झाली आहे. सध्या चंद्रपूर वीज केंद्रातून केवळ १२०० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे.
उन्हाळ्याला सुरुवात होताच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला बिघाडीचे ग्रहण लागले आहे. त्याचाच परिणाम टय़ूबलिकेजमुळे २१० मेगावॉटचा दुसरा व ५०० मेगावॉटचा सातव्या क्रमांकाचा संच बंद पडला आहे. २३४० मेगावॉट उत्पादन क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात २१० मेगावॉटचे चार, तर ५०० मेगावॉटचे तीन संच आहेत. उन्हाळ्यात सातत्याने संच बंद पडू नयेत म्हणून या सातही संचाचे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम उन्हाळ्यापूर्वीच करण्यात आले होते. परंतु, बिघाडाचे ग्रहण लागल्याने काल गुरुवारी वीज केंद्रातील २१० व ५०० मेगावॉटचे दोन्ही संच टय़ूबलिकेजमुळे बंद पडले.
आता हे दोन्ही बंद पडलेले संच पूर्ववत सुरू करण्यासाठी वीज केंद्राचे अभियंते युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. मध्यरात्री उशिरापर्यंत दोन्ही संच सुरू होतील, अशी माहिती मसराम यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.