‘ऑस्कर’साठी अ‍ॅनिमेशनपटांच्या विभागात ‘हे कृष्णा’ आणि ‘दिल्ली सफारी’ या दोन अ‍ॅनिमेशनपटांच्या प्रवेशिका पाठविण्यात आल्या आहेत. ८५ व्या अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्स अर्थात ऑस्करच्या नामांकित पुरस्कारांसाठी असलेल्या स्पर्धेत जगभरातील २१ अ‍ॅनिमेशनपट दाखल झाले आहेत. त्यात भारताकडून या दोन प्रवेशिका पाठविण्यात आल्या आहेत. निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘दिल्ली सफारी’ हा थ्रीडी अ‍ॅनिमेशनपट आहे ज्यात दिल्ली वारी करणाऱ्या प्राण्यांची गोष्ट आहे. या चित्रपटासाठी अक्षय खन्ना, गोविंदा, सुनील शेट्टी, बोमन इराणी आणि उर्मिला मार्तोडकर यांनी आवाज दिला आहे. तर ‘हे कृष्णा’ (कृष्ण और कंस) हा विक्रम वेतुरी दिग्दर्शित थ्रीडी अ‍ॅनिमेशनपट आहे. या दोन अ‍ॅनिमेशनपटांबरोबर ‘रेक इट’, ‘राल्फ’, ‘ब्रेव्ह’, ‘मादागास्कर ३’, ‘अ‍ॅडव्हेंचर्स इन झाम्बेझिया’, ‘डॉ. स्यूस’, ‘द लॉरेक्स’, ‘फ्रॅंकेनविनी’, ‘फ्रॉम अप ऑन पॉपी हिल’, ‘हॉटेल ट्रान्सिल्वनिया’, ‘आईस एज : कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट’, ‘ए लायर्स ऑटोबायोग्राफी : द अनट्रय़ू स्टोरी ऑफ माँटी पायथॉन्स ग्रॅहम चॅपमन’ आणि ‘द मिस्टिकल लॉज’ या चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. मात्र, यापैकी अनेक चित्रपटांनी लॉस एंजेलिस येथे चित्रपट प्रदर्शित केलेला असावा, ही अट पूर्ण केलेली नाही. या सर्वच चित्रपटांना ऑस्करच्या नामांकन विभागात प्रवेश मिळविण्यासाठी लागू असलेल्या सर्व अटीशर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे. तरच ते पुढील मतदानाच्या पातळीवर जाऊ शकतील, असे ‘ऑस्कर’ने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. ‘ऑस्कर’ पुरस्कारांच्या स्पर्धेसाठी या २१ अ‍ॅनिमेशनपटांपैकी कोणत्या चित्रपटाना नामांकन मिळणार याची घोषणा १० जानेवारीला होणार असून त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ‘ऑस्कर’चा सोहळा होणार आहे.