कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या तीन वर्षांत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या बांधकामांसाठी जागोजागी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. या भरावामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे यामुळे तुंबू लागली आहेत.
टिटवाळा परिसरात शेतजमिनींवर भराव टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांच्या कडेला भराव टाकून गाळे, टपऱ्या, चाळी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जागोजागी पाणी अडले आहे. पाणी वाहून जाण्यासाठी मोठय़ा नाल्यांची सुविधा नसल्याने या भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. डोंबिवली पूर्व परिसरातील कोपर रेल्वे स्थानक भागात एमआयडीसी तसेच २७ गावांमधून येणारे पाणी नाल्याने खाडीला मिळत होते. कोपर पूर्व भागात चाळींसाठी मोठय़ा प्रमाणात भराव टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात पावसाचे पाणी नवीन अनधिकृत वस्तींमध्ये शिरू लागले आहे. या परिसरात काही भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंबिवली पूर्व भागातील चोळेगाव, खंबाळपाडा भागात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे एमआयडीसी भागातून वाहून येणारे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरू लागले आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नाले नाहीत. त्यामुळे या भागात शेतांमध्ये मोठे तलाव तयार झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेत खाडीचे भरतीचे पाणी महाराष्ट्रनगर, देवीचापाडा भागात येत असे. डोंबिवली एमआयडीसी हद्दीत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याने नाले लहान करण्यात आले आहेत. त्यामुळे मिलापनगर उद्यान, उस्मा पेट्रोलपंप, एम्स रुग्णालय, साईबाबा मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले आहे. नवीन अनधिकृत बांधकामांमुळे हे पाणी येणे बंद झाले आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, खडेगोळवली परिसरात पूरसदृश परिस्थिती आहे.