नवी मुंबईच्याच विकासाच्या नकाशात असलेल्या उरण तालुक्याला नवी मुंबईला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी बेलापूर ते उरण रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गव्हाण ते जासई दरम्यानच्या मार्गासाठी जमिनी संपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. प्रकल्पग्रस्तांना मागील संपादनाचा कटू अनूभव, सिडको आणि रेल्वे विभागाचा समन्वयाचा अभाव याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
मंगळवारी रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला असला तरी अपूर्ण रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कोणतीही घोषणा यात करण्यात आलेली नाही. बेलापूर ते उरण हा गेली अनेक वर्षांपासून सिडको आणि रेल्वेच्या भागीदारीतून घोषित करण्यात आलेला मार्ग कधी होणार, असा सवाल आता येथील जनता विचारू लागली आहे. रेल्वे हा वाहतुकीचा स्वस्त व वेळेत जाण्याचा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सध्या नवी मुंबई शहरालगतच असलेल्या व झपाटय़ाने विकसित होणाऱ्या उरण शहर व तालुक्यातील नागरिकांना या प्रवासाची सोय झाल्यास रस्ता मार्गावरील ताण कमी होऊन प्रवासही सुखकर होण्यास मदत होणार आहे. गेली पंधरा ते वीस वर्षांपासून या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव असून सीवूड-बेलापूर ते गव्हाण दरम्यान या रेल्वे मार्गाचे काम काही प्रमाणात पूर्ण करण्यात आलेले आहे. गव्हाण ते जासई दरम्यानच्या मार्गासाठी जमिनी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुरुवात केलेली असताना येथील शेतकऱ्यांनी मागील भूसंपादनाचा कटू अनुभव पाहता विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उरण ते बेलापूर दरम्यानच्या रेल्वेचे भवितव्य अंधारमय दिसू लागले आहे.