राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्याशाखेतील उपकुलसचिव मनीष झोडपे गोंडवाना विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर जावून पुन्हा त्यांच्या मूळ संस्थेत रूजू झाले असले तरी गोंडवाना विद्यापीठातील डोकेदुखी त्यांच्या मागे कायम असल्याचे तक्रारीवरून स्पष्ट झाले. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात काम करीत असताना त्यांनी गैरफायदा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
गडचिरोलीतील महिला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नंदा सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झोडपे पेपर काढतात, पेपर तेच छापतात आणि गुणही वाढवून घेतात, असा आरोप केला आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत झोडपे परीक्षा विभागात उपकुलसचिव(गोपनीय) पदावर १८ जुलै २०१४ ते १० एप्रिल २०१५ पर्यंत होते. झोडपे यांनी यापूर्वी नागपूर विद्यापीठाची परीक्षा एम.ए.(समाजशास्त्र) ही उन्हाळी २०१२, उन्हाळी २०१३मध्ये कुरखेडय़ाच्या गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात दिली होती.
तरीही त्यांनी उन्हाळी २०१५ला एम.ए (समाजशास्त्र) भाग २ ची परीक्षा १० ते २२ एप्रिल २०१५ या दरम्यान गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालय या केंद्रावर दिली. परीक्षा विभागाच्या उपकुलसचिव गोपनीय विभागात काम करीत असताना अशा प्रकारे परीक्षा देणे विद्यापीठ नियमाचा भंग आहे. त्या परीक्षेत त्यांना अपेक्षित गुण न मिळाल्याने त्यांनी प्रत्येक परीक्षेत गुण वाढवले.
पदावर काम करीत असताना त्यांनी अवैधरित्या गडचिरोलीच्या शिवाजी महाविद्यालयातून परीक्षा अर्ज भरून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सातपुते यांनी तक्रारीत केला आहे. पदाचा गैरवापर करून त्यांनी १०० पैकी ७५ ते ८० गुण वाढवून घेतले आहेत. म्हणून विद्यापीठाच्या शिस्तपालन कृती समितीकडे प्रकरण सोपवून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.

यासंदर्भात मनीष झोडपे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी आठ ते दहा वर्षे नागपूर विद्यापीठातच होतो. जे काही अवैध लाभ तेव्हाच घेता आला असता. शिवाय २०१२ आणि २०१३मध्ये नागपूर विद्यापीठाशी संबंध नव्हता. तेव्हा मी गोंडवाना विद्यापीठात होतो. म्हणून नागपूर विद्यापीठाची परीक्षा देण्यास पात्र होतो. ७५ ते ८० गुण वाढवून घेऊ शकलो असतो तर पुन्हा परीक्षा देण्याचा खटाटोप कशाला केला असता, असा प्रतिसवाल त्यांनी केला. सर्वात महत्त्वाचे गोपनीय विभागाचा उपकुलसचिव मी कधीच नव्हतो. यापूर्वी उपरांत (पोस्ट) परीक्षेचा उपकुलसचिव होतो. एकूणच तक्रार अतिशय हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली असून प्राध्यापक सातपुते माझे मित्र असून त्यांना हाताशी धरून कोणीतरी स्वत:चा फायदा करून घेत असल्याचे तक्रारीवरून दिसून येत असल्याचे झोडपे म्हणाले.