अवकाळी पावसामुळे पनवेलमधील १२०७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर या अवकाळी पावसाचा फटका ८९४ शेतकऱ्यांना बसल्याची माहिती पनवेलच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाली आहे. यामध्ये भातशेती, कडधान्य, वेली वर्गपिके व आंबा काजू पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसानीचा आकडा अंदाजे पाच कोटी रुपयांचा असण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दोन दिवसांच्या पावसाच्या पाण्याच्या शिडकाव्याने कृषी विभागातील अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. दोन दिवसांत किती नुकसान झाले असावे यासाठी या विभागातील कर्मचारी ठिकठिकाणाहून माहिती संकलित करीत आहेत. पनवेलमध्ये १० हजार ९५० हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते, त्यापैकी उन्हाळी भातशेतीपैकी ४० एकर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सातशे हेक्टर जमिनीवर वेलीवर्ग पीक घेतले जाते त्या पिकाचेही नुकसान झाले आहे. वेलीवर्ग पिकातील काकडी, घोसाळी, कारले तसेच कडधान्यपिकांत वाल, मूग, तूर यासह १६२.७ हेक्टर जमिनीवरील भाजीपाला पिकावर अवकाळी पावसाची वक्रदृष्टी पडली असून २९८.६२ हेक्टर जमिनीवरील आंबा पिकावरही या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. काजूपिकाचे ६ हेक्टरचे नुकसान झाले आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे. जयासोबत रत्ना, सुवर्णा, कर्जत १, २, ३ व कोलम या बियाण्यांनी येथील शेतकरी भातशेती करतात. या पिकांचेही नुकसानीच समावेश आहे.
सरकारच्या सूचनेनुसार कृषी विभागाचे पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषी अधिकारी आर. डी. बनकर यांनी दिली. २००९ साली फयानच्या तडाख्यात पनवेलची भातशेती आली होती. त्यावेळी येथील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई सरकारने दिली होती.
दोन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी कापणीनंतर शेतात ठेवलेल्या भाताच्या पेंढय़ांना बुरशी लागल्याने शेतकऱ्यांनी पनवेलच्या तहसील कार्यालयात नुकसानभरपाई मिळावी यासाठी निवेदन दिले आहे. मंगळवारपासून कृषी विभागाने ग्रामीण पनवेलच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. हे पंचनामे तहसील, पंचायत समिती व कृषी विभाग असे संयुक्तिक होणार आहेत.