जि.प.चा कारभार
जिल्हय़ात सध्या १८ तासांचे भारनियमन सुरू आहे. वीजपुरवठा जवळपास बंदच असताना ग्रामपंचायत कार्यालयातील संगणकही धूळ खात पडले आहेत. असे असले, तरी जिल्हा परिषदेकडून संग्राम कक्षासाठी यूपीएसची खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यूपीएसच्या खरेदीच्या नावाखाली होणारी लाखोची उधळपट्टी थांबविण्यासाठी काही मंडळी पुढे सरसावली असून, या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. जिल्हय़ातील ग्रामपंचायतींचे कामकाज ऑनलाइन करण्याच्या हेतूने जि.प. प्रशासनाने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ५६५ ग्रामपंचायत कार्यालयांत संग्राम कक्षासाठी संगणक खरेदी केले आहेत. परंतु जिल्हय़ात सध्या १८ तासांपेक्षा जास्त भारनियमन केले जात असल्याने सर्वत्र संगणक धूळ खात पडले आहेत. अनेक ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक सायबर कॅफेमध्ये बसून रेकॉर्ड ऑनलाइन करताना पाहावयास मिळतात. भारनियमनामुळे वीजपुरवठा बंद असल्याने संगणक बंद असतात. त्यामुळे संगणकासाठी यूपीएसच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद येथील मर्जीतील कंपनीला माल पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे. केवळ ६० मिनिटांचा बँकअप देणाऱ्या यूपीएस खरेदीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याने जिल्हय़ात हा मोठय़ा चर्चेचा विषय झाला आहे.