मुंबईसह अनेक शहरांतून ओएनजीसीमार्फत गेल कंपनीकडून पाइपलाइनद्वारे शहरातील नागरिकांना घरगुती गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र ज्या शहरालगत ओएनजीसीचा प्रकल्प गेल्या ३५ वर्षांपासून सुरू आहे, त्या उरण शहरातील नागरिकांना गॅस सिलेंडरमधून गॅसचापुरवठा केला जातो. आता तालुक्यातील जनतेनेही पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचा आग्रह ओएनजीसीकडे धरला आहे.
१९८१ मध्ये अरबी समुद्रातील बॉम्बे हाय तेल विहिरीतून तेल काढण्यास सुरुवात करण्यात आली. या तेल विहिरीतून काढण्यात आलेल्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करणारे ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उरण येथील पिरवाडी समुद्रकिनारी उभारण्यात आला. याच प्रकल्पात तयार होणारा घरगुती गॅस मुंबईसह इतर अनेक शहरांना पाइपलाइनद्वारे पुरविला जात असताना या प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाकडून या तालुक्यातील नागरिकांना ही सुविधा मिळणे आवश्यक असून, उरण तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरीकरणातही वाढ झालेली आहे. त्यामुळे उरण तालुक्यालाही आता शहराचे स्वरूप येऊ लागल्याने इतर शहरांप्रमाणेच उरण तालुका व शहरालाही ओएनजीसीने पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्याची मागणी करणारे प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली आहे.