जेएनपीटी तसेच उरण तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे या परिसरातील वाहतुकीत वाढ होत आहे. उरण तालुक्यात जागतिक दर्जाचे जेएनपीटी बंदर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ओ.एन.जी.सी., वायू विद्युत केंद्र तसेच प्रस्तावित नवी मुंबई सेझ व जेएनपीटी सेझसह चौथे व पाचवे बंदर यामुळे वाहनांची संख्या अधिक वाढणार असल्याने तालुक्याला जोडणाऱ्या जेएनपीटी ते पळस्पे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब आणि उरण ते पामबीच मार्ग राज्य महामार्ग क्रमांक ५४ या दोन्ही मार्गाचे रुंदीकरण करून ते आठपदरी करण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या कामासाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. जेएनपीटी बंदरातील कंटेनर हाताळणीची क्षमता दिवसेंदिवस वाढत असून येत्या काही वर्षांत ती दुपटीपेक्षाही अधिक होऊन ती एक कोटीपर्यंत वाढणार आहे.