उरण ते नवी मुंबईदरम्यान सुरू असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बससेवची सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली नवी मुंबई ते उरण ही वातानुकूलित बससेवा अखेर जानेवारीपासून बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी या महागडय़ा सेवेला प्रतिसाद न दिल्याने ही सेवा बंद करावी लागली आहे. तर दुसरीकडे एनएमएमटीच्या उरणमधील ३०, ३१ व ३९ क्रमांकाच्या मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच नेहमीप्रमाणे या मार्गावरील नादुरुस्त होणाऱ्या बसेसची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळेही प्रवासी त्रस्त झाले आहेत. या मार्गावरून दररोज २५ हजारापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.
उरण ते नवी मुंबईदरम्यानच्या प्रवासासाठी असलेली नवी मुंबई महानगरपालिकेची एनएमएमटी ही बससेवा सध्या जीवनरेखा बनली आहे. उरणमधून मुंबई तसेच नवी मुंबईत जाणाऱ्या तसेच मुंबई व नवी मुंबईमधून कामानिमित्ताने जेएनपीटी व उरण परिसरात येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरत आहे. कोपरखैरणे, घणसोली ते उरणदरम्यानच्या ३१ क्रमांकाच्या बसच्या मार्गासाठी तीन, या मार्गावरील ३९ क्रमांकासाठी दहा तसेच उरण ते कळंबोली त्याचप्रमाणे नव्याने जेएनपीटी कामगार वसाहत ते जुईनगर रेल्वे स्थानकादरम्यानच्या प्रवासासाठी दहा अशा एकूण तीस बसेसच्या माध्यमातून दहा ते पंधरा मिनिटाला एक अशी सेवा पुरविली जात असल्याची माहिती तुर्भे विभागाचे असि. डेपो मॅनेजर धर्मराज भगत यांनी दिली आहे. तसेच या मार्गावरून दररोज एनएमएमटीला दोन लाख रुपयांची रक्कम जमा होत आहे. एनएमएमटीच्या चारही मार्गावरून दिवसाला २५ हजार प्रवासी प्रवास करीत असून एकूण १५० फेऱ्या होतात. या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. असे असले तरी दर रोज किमान एक ते दोन बसेस बंद पडण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी आणि जुन्या बसेस असल्याने बसेस बंद पडण्याच्या घटना वाढल्याची माहिती वाहतूक नियंत्रकांनी दिली आहे. उरणमधील वाढत्या प्रवासी संख्येमुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेली वाशी ते उरणदरम्यानची बससेवा सुरू केली होती. ३७ किलोमीटरच्या प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित बससेवेसाठी प्रवाशांना एकेरी प्रवासासाठी ९० रुपये मोजावे लागत होते. ही रक्कम अधिक असल्याने उरणमध्ये येणाऱ्या तसेच नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने वातानुकूलित सेवा बंद करण्यात आलेली आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात महानगरपालिकेच्या बससेवेसाठी नवीन बस येण्याची शक्यता असून या नवीन बसेसमुळे उरण ते नवी मुंबईदरम्यानच्या प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
जगदीश तांडेल, उरण