पावसाच्या तडाख्यामुळे गगनाला भिडलेले भाज्यांचे भाव पुन्हा जमिनीवर आले आहेत. वाशीच्या घाऊक बाजारात दहा किलो भाज्या १०० ते १५० रुपये दराने मिळू लागल्याने किरकोळ विक्रीचे दरही उतरायला सुरुवात झाली आहे. पावसाने महिनाभर उघडीप दिल्याने भाज्या आवाक्यात येण्यास सुरुवात झाली असली तरी भाव पूर्ववत होण्यासाठी आणखी एखाद महिना लागण्याची शक्यता आहे.  मुसळधार पावसामुळे भाज्यांना फटका बसला आणि आवक कमी झाली. त्यातच कृत्रिम टंचाई दाखवून व्यापाऱ्यांनी भाज्या सोन्याच्या दराने विकायला सुरुवात केली. पाव किलो भेंडीसाठीही चाळीस रुपये, फ्लॉवरसाठी तीस रुपये, फरसबीसाठी ३५ रुपये मोजावे लागत असल्याने जेवणातून भाज्या गायब झाल्या. ‘पण आता भाज्यांचे भाव खाली उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर भाज्या सढळहस्ते घेता येतील,’ असे कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सचिव अविनाश पाटील यांनी सांगितले.
भायखळा भाजीबाजारात काही भाज्यांचा दर खाली आला असला तरी कांदे, आले अजूनही महाग आहेत. मेथीच्या मोठय़ा जुडीसाठीही ३० ते ३५ रुपये मोजावे लागत आहेत.  सर्वसाधारण भाज्यांचा किलोसाठी दर ३० ते ४० रुपये आहे. ‘पावसाने महिनाभर उघडीप दिल्याने भाज्यांचे दर खाली आले आहेत. मात्र अजूनही कांदे, गवार, टोमॅटो तसेच इतर भाज्यांचे दरही पूर्ण खाली उतरलेले नाहीत. हे दर खाली उतरण्यासाठी एक ते दीड महिना लागेल,’ अशी माहिती भायखळा भाजीपाला व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील भाव (१० किलो)
फ्लॉवर ८० ते १२० रुपये
भेंडी  १०० ते २४० रुपये
कोबी  १०० ते १४० रुपये
शिराळी  १०० ते १४० रुपये
भोपळा  ६० ते १०० रुपये
टोमॅटो  १०० ते २०० रुपये

भायखळा बाजारातील भाव (प्रतिकिलो दर)
टोमॅटो  २८ ते ३० रुपये
कोबी  २० ते २५ रुपये
कॉलीफ्लॉवर  ३५ ते ४० रुपये
वांगी  ३६ते ४०रुपये
गवार  ५० रुपये
भेंडी ३०रुपये
भोपळी मिरची  ३४ ते ३६ रुपये
मेथीची जुडी  ३० ते ३५ रुपये
पालक १० ते १२ रुपये
दुधी  ४० रुपये
आले  १२० रुपये
कांदे  ५० रुपये
बटाटे २० रुपये