डोंबिवलीतील विजेच्या खांबांवर सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचे अनधिकृत फलक लावून शनिवारी डोंबिवली शहर विद्रूप केले होते. विद्रूपीकरणाविषयी नागरिकांनी रोष व्यक्त करताच केंद्रीय निवडणूक निरीक्षक ए. टी. जेम्स यांनी पथकासह या विद्रूपीकरणाची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिले. या पत्राची दखल घेऊन शनिवारी रात्री साडेदहा ते रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पालिका कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सुमारे पाचशे ते सहाशे अनधिकृत फलक जप्त केले.
शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे फलक आणि झेंडय़ांचा या जप्तीमध्ये समावेश असल्याचे पथकातील कर्मचाऱ्याने सांगितले. डोंबिवलीतील विजेचे खांब, इमारती, घरे यांवर उमेदवारांकडून अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. सर्व पक्ष कार्यालयांसमोर रस्ते अडवून कमानी उभारण्यात आल्या आहेत. हे सर्व नियमबाह्य आहे. ही कृती आचारसंहिता भंगाची असल्याने तातडीने हे फलक व अतिक्रमण काढून टाकण्यात यावे, असे पत्र डोंबिवली विभागाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक ए. टी. जेम्स यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे पालिका उपायुक्त सुरेश पवार यांना पाठवले. तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
मे मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक निरीक्षक, निवडणूक आयोग आणि आचारसंहितेचा मुलाहिजा न ठेवता सर्व उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत फलक लावले होते. निवडणूक निरीक्षकांनी फलकबाजीचा जाब विचारला असता भिसे यांनी कारवाईबाबत निष्क्रियता दाखवली. या प्रकरणावरून भिसे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. असे असताना शनिवारी दिवसभर डोंबिवलीत सर्व पक्षीय उमेदवारांचे अनधिकृत फलक लागले असताना पालिका अधिकारी गप्प का बसले होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच याबाबत संबंधित उमेदवार व सुस्त पालिका अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे. एका सुज्ञ नागरिकाने विद्रूपीकरणाबाबत राज्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे, केंद्रीय निवडणूक निरीक्षक ए. टी. जेम्स यांच्याकडे तक्रार केली आहे.
पालिकेच्या ठेकेदाराने सांगितले, आमची परवानगी न घेता उमेदवारांनी लावलेले सुमारे पाचशे ते सहाशे प्रचार फलक रविवारी पहाटेपर्यंत पालिका कर्मचाऱ्यांनी काढून टाकले आहेत. जप्त केलेल्या सर्व फलक, झेंडय़ांचा पंचनामा करून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.  
कारवाईचा बडगा
डोंबिवली विभागाचे निवडणूक अधिकारी जयराम देशपांडे यांनी सांगितले, निवडणूक अधिकारी, पालिका यांची परवानगी न घेता काही उमेदवारांनी डोंबिवलीत सुमारे २४५हून अधिक प्रचाराचे फलक लावले होते. त्यामध्ये झेंडय़ाचा समावेश आहे. हे सगळे फलक काढले आहेत. त्यांचा पंचनामा करून संबंधित उमेदवारांवर कारवाई करण्याचे पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. पालिका उपायुक्त सुरेश पवार यांच्याशी सतत संपर्क करूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.