विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गेल्या काही निवडणुकांमध्ये अपक्षांची संख्या वाढताना दिसत आहे. निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांची गर्दी कमी करण्यासाठी अनामत रक्कम वाढविण्यासह आयोगाने इतरही उपाययोजना केल्या असल्या तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही सर्वच मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात अपक्ष रिंगणात उतरले आहेत, अपक्षांच्या या भाऊगर्दीत मोजकेच ‘सक्षम’ असून तेथील लढतीच सध्या चर्चेत आहेत.
निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांची संख्या कमी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने अनामत रकमेत वाढ केली होती. यामुळे काही प्रमाणात अपक्षांच्या संख्येत घट झाली असली तरी त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही, असे रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संख्येवरून स्पष्ट होते. अपक्षांना विविध पक्षांच्या बंडखोर उमेदवारांची जोड मिळाली. अपक्ष, मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांचे उमेदवार, बंडखोर यांची विदर्भातील संख्या फारशी नसली तरी अनेक हौसे, नवसे व गवसे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या अपक्षांच्या या भाऊगर्दीत मोजकेच उमेदवार सक्षम असून ते मुख्य लढतीत असून निर्णायक स्थितीत आहेत. इतरांची मात्र साधी दखलसुद्धा घेतली जात नाही.
विदर्भातील या सक्षम उमेदवारांमध्ये बडनेरामधून आमदार रवी राणा, अचलपूर मतदारसंघातून आमदार बच्चू कडू, कारंजा मतदार संघातून प्रकाश डहाके, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी, गोंदियातून राजेश चतुर, तिरोडामधून दिलीप बन्सोड, आर्वी मतदार संघातून स्वप्नील जगताप, बाळापूरमधून प्रकाश तायडे, मूर्तीजापूरमधून प्रतिभा अवचार यांचा समावेश आहे. प्रकाश डहाके राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहे’. बंडखोरी करीत ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. बंडखोरांमुळे जिल्ह्य़ात सर्वाधिक चर्चेत आहे तो दक्षिण नागपूर मतदारसंघ. या मतदार संघात शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी  शिवसेनेच्या विरोधात उमेदवारी अर्ज सादर केला या मतदार संघातील लढत चुरशीची झाली आहे.
मध्य नागपुरातही यंदा काँग्रेसचे अनिस अहमद आणि भाजपचे विकास कुंभारे या प्रमुख उमेदवारांपेक्षा अपक्ष असलेल्या आभा पांडे या काँग्रेसच्या पदाधिकारी अधिक चर्चेत आहेत. उत्तर नागपुरात डॉ. नितीन राऊत आणि मिलिंद माने अशी लढत असताना यांना शह देण्यासाठी माजी नगरसेवक धरमकुमार पाटील आणि राजू हत्तीठेले रिंगणात आहेत. उमरेड मतदारसंघात राजू पारवे, हिंगणामध्ये राहुल मून, रामटेकमध्ये काँग्रेसचे बंडखोर प्रकाश लोणारे रिंगणात असून ते आपापल्या मतदारसंघात सक्षम उमेदवार म्हणून समोर आले आहेत. नागपूर शहर आणि जिल्ह्य़ात सर्वाधिक १३ अपक्ष उमेदवार मध्य नागपुरात आहेत. उत्तर नागपूर ११, उमरेड ६, रामटेक ६, हिंगणा ५, पश्चिम नागपूर ८, दक्षिण-पश्चिम नागपूर ६, दक्षिण नागपूर ८, पूर्व नागपूर ९, काटोल ९, सावनेर ८, कामठी ६ असे एकूण २११ पैकी ७६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.  उर्वरित विदर्भात लोकप्रिय नसलेले पक्ष आणि अपक्ष असे ३४० च्या आसपास उमेदवार आहेत. असे असले तरी यातील काही मोजकेच उमेदवार मुख्य पक्षांतील उमेदवारांना खरी टक्कर देणार आहेत.