News Flash

सांस्कृतिक मंत्र्यांचा भेदभाव संग्रहालयांच्या मुळावर?

सिंदखेडराजा येथील लखुजी जाधव राजवाडय़ातून तोफ चोरीला गेली म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व १३ वस्तुसंग्रहालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची घोषणा विधानसभेत गेली

| December 27, 2014 01:05 am

सिंदखेडराजा येथील लखुजी जाधव राजवाडय़ातून तोफ चोरीला गेली म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व १३ वस्तुसंग्रहालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची घोषणा विधानसभेत गेली. मात्र, याच सांस्कृतिक मंत्र्यांना ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयातून गायब झालेल्या १२३६ वन्यजीव ट्राफीजची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही. विशेष म्हणजे विधानभवनाच्या मागेच हे संग्रहालय आहे आणि गेल्या वर्षभरापासून या ना त्या कारणाने हे संग्रहालय चर्चेच्या फेऱ्यात अडकले आहे. त्यामुळे संग्रहालयाच्या बाबतीतला सांस्कृतिक मंत्र्यांचा भेदभाव संग्रहालयांच्या मुळावर तर बेतणार नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
तब्बल आठ महिन्यांपासून नागपुरातील या मध्यवर्ती संग्रहालयातील वन्यजीव ट्राफीज गायब होण्याचे प्रकरण गाजत आहे. वन्यजीवप्रेमी विनित अरोरा यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवल्यानंतर संग्रहालयातील वन्यजीव ट्राफीज गायब होण्याचे प्रकरण उघडकीस आले. मध्यभारतातील हे एकमेव ब्रिटिशकालीन संग्रहालय आहे. १५०हून अधिक वष्रे या संग्रहालयाला झाली असून, राज्यातल्या इतर संग्रहालयात नसतील असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा या संग्रहालयात आहे. मात्र, अभिरक्षक पदावर अपात्र व्यक्तींची नेमणूक या संग्रहालयाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरली. दुर्मीळ ठेवा या संग्रहालयातून गायब झाला, पण त्याची दखल घेतली गेली नाही. मोडकळीस आल्यागत आणि भयाण वाटावी अशी या संग्रहालयाची अवस्था झाली. याच काळात संग्रहालयात असलेला वन्यजीव ट्राफीजचा अनमोल ठेवा तत्कालीन अभिरक्षकाच्या आशीर्वादानेच गायब झाला. ही जबाबदारी जेवढी सांस्कृतिक खात्याची तेवढीच वनखात्याचीसुद्धा होती.
वन्यजीव ट्राफीज गायब होण्याचे प्रकरण एका वन्यजीवप्रेमीच्या तत्परतेमुळे उघडकीस आल्यानंतर दोन्ही खात्याने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. वनखात्याने रडतफडत का होईना चौकशी सुरू केली आणि कशीतरी चौकशी आटपून त्याचा अहवाल सादर केला. या अहवालात काय दडले आहे हे अजून बाहेर आले नसले तरीही अहवाल अधिवेशनाच्या काळातच तयार होऊन संबंधितांना सादर केला गेला. दरम्यान, प्रसारमाध्यमातून या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर दोन्ही खात्याचे मंत्री पावलाच्या अंतरावरील या संग्रहालयाला भेट देऊन चौकशी करतील अशी अपेक्षा होती, पण वनमंत्र्यांनाही या अनमोल ठेव्याच्या गायब होण्याचे सोयरसुतक नसल्याचे दिसले आणि सांस्कृतिक मंत्र्यांविषयी तर न बोललेलेच बरे, अशी अवस्था झाली. याच काळात सिंदखेडराजाच्या संग्रहालयातील प्रकरण गाजले. चोरीला गेलेली तोफही सापडली आणि आरोपीसुद्धा सापडले. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या शेवटी शेखी मिरवण्यासाठी राज्यातील सर्वच संग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच सांस्कृतिक मंत्र्यांना वन्यजीवांचा हा अनमोल ठेवा एकदोन नव्हे तर हजाराच्या संख्येने गायब झाल्यानंतरही चार पावले चालून त्याची चौकशी करणे तर दूरच, पण दखलही घ्यावीशी वाटली नाही, याविषयी वन्यजीवप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2014 1:05 am

Web Title: vinod tawde ignore disappearance of wildlife trophy from central museum
टॅग : Vinod Tawde
Next Stories
1 अभाविपतर्फे विदर्भस्तरीय विद्यार्थिनींचे संमेलन जानेवारीत
2 अल्पवयीन मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न
3 वडाळी निसर्ग संकुलात इ-बर्ड कार्यशाळा
Just Now!
X