नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलै महिन्यात होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिली.
भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्य़ांचा नागपूर पदवीधर मतदारसंघात समावेश आहे. विभागीय आयुक्त हे या मतदारसंघाचे नोंदणी अधिकारी तर प्रत्येक जिल्ह्य़ांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतात. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुन्हा मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नोंदणी सुरू राहील. नोंदणीसाठी अठरा क्रमांकांचा अर्ज भरावा लागेल. त्यासोबत पदवी किंवा पदविकेच्या दोन प्रमाणित प्रती, अंतिम गुणपत्रिका, नोकरीत असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचे पदवीधर किंवा पदविकाधारक असल्याचे प्रमाणपत्र, शासकीय नोकरी असल्यास सव्‍‌र्हिस बुकच्या पहिल्या पानाची प्रत, रहिवासी पुरावा जोडणे आवश्यक राहील. मतदार नोंदणीसाठी पदवी किंवा पदविका १ नोव्हेंबर २०१० पूर्वी प्राप्त झालेली असली पाहिजे.
नागपूर विभागात २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत १ लाख ८३ हजार ७२६ पदवीधर मतदार होते. २०१३ मध्ये २ लाख ७७ हजार ७४ मतदार नोंदणी झाली. ९३ हजार ३४८ एवढी ही वाढ आहे. मात्र, नोंदणीचे प्रमाण कमी आहे. त्यातही महिलांचे प्रमाण कमीच आहे. नागपूर जिल्ह्य़ात ३६ टक्के, वर्धा जिल्ह्य़ात ३८ टक्के, चंद्रपूर जिल्ह्य़ात २४ टक्के, भंडारा जिल्ह्य़ात २४ टक्के, गोंदिया जिल्ह्य़ात ३९ टक्के तर गडचिरोली जिल्ह्य़ात २१ टक्केच महिलांची नोंदणी झाली आहे. विवाह झाल्यानंतर अनेकांनी महिलांनी नावेच नोंदविलेली नाहीत, त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून नाव नोंदणी करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. पदवीधर मतदारांची नोंदणी वाढविण्याच्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी झाली. जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मतदारयादीतून नावे वगळल्याच्या तक्रारी मोठय़ा संख्येने लोकसभा निवडणुकीत आल्या. त्यामुळे पदवीधर असलेल्या जागृत मतदारांनी नावे मतदारयादीत आहेत की नाही, हे तपासून पाहावे. त्या त्या जिल्ह्य़ाच्या वेबसाईटवर मतदारयादी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. विभागीय उपायुक्त आप्पासाहेब धुळज पत्रकार परिषदेला उपस्थित होते.