स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत गेल्या अडीच तपापासून अग्रभागी राहणाऱ्या खासदार दत्ता मेघे यांनी स्वतंत्र विदर्भ तूर्तास शक्य नसल्याचा दिलेला निर्वाळा ही राजकीय अनुभवापासून आलेली उपरती की, व्यवहारवादी राजकारणाची अनुभूती, असा संभ्रम असला तरीही विदर्भवाद्यांपासून एक आघाडीचा म्होरका दूर झाल्याचे यातून प्रथमच स्पष्ट झाले आहे.
तेलंगणाच्या निमित्याने विदर्भाचा सूर धोटे-मुत्तेमवार प्रभृतींनी काढल्यावर सहाजिकच खासदार दत्ता मेघेंची आठवण सर्वत्र निघाली. पण, त्याबाबत मेघे तीन दिवस मौन बाळगून राहिले. डेबाईंच्या निमित्याने वादळ उठल्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंबई-विदर्भासह महाराष्ट्र एकसंघ राहण्याची ग्वाही दिली अन् दोनच दिवसांनी खासदार मेघे आपल्या भूमिकेसह पुढे आले. वध्र्याच्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत नकारात्मक सूर आळवला. या विषयावर ते प्रथमच मवाळलेले दिसले. तेलंगणसारखा सर्वपक्षीय उद्रेक नाही. या प्रश्नावर वैदर्भीय नेते निवडून आले नाही व महत्वाचे म्हणजे, शेवटी हायकमांडची इच्छा सर्वोच्च असल्याचे मेघेंचे कथन हे या प्रश्नावर त्यांचे बदलत्या सूराचा आधार ठरावे. नव्वदच्या दशकात सावंगी येथील मेघेंचे कार्यालय हे विदर्भवाद्यांचा अड्डा बनले होते. आंदोलनाची रूपरेषा याठिकाणी अंतिमरीत्या ठरत असे. दुसरे एक विदर्भवादी प्रमोददादा शेंडे यांना या चळवळीचे नेतृत्व देऊ करून मेघेंनी सर्व ताकद पणाला लावली होती. पुढे त्यांचे आदर्श असलेले शरद पवार हे याविषयी अनुकुल नसल्याचे दिसून आल्यावर त्यांनाही मवाळ करण्यात मेघेंना यश आले होते. लोकांची इच्छा असल्यास स्वतंत्र विदर्भाला आपला विरोध राहणार नाही, अशी कबुली पवार यांनी मेघेंच्या साक्षीने नागपुरात एकेकाळी दिली.
सेवाग्राम आश्रमापासून आंदोलन, उपोषण, मोर्चा, बंद, दिल्ली-मुंबईत शिष्टमंडळ, चर्चासत्र या माध्यमातून मेघे स्वतंत्र विदर्भाचे एक कट्टर समर्थक म्हणून पुढे आल्याची नोंद अवघ्या विदर्भाने घेतली होती. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व त्यापूर्वी सीताराम केसरी यांच्याही दरबारात मेघे हा प्रश्न घेऊन पोहोचल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. राजीव गांधी, नरसिंहराव, एच.डी.देवेगौडा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ.मनमोहनसिंह या पंतप्रधानांकडे पाठपुरावा करतांना विदर्भाच्या प्रश्नावर मेघे ठाम असल्याचे चित्र भारतभरात उमटले होते. आता यापासून नेमकी विरुध्द मवाळलेली भूमिका निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मेघे घेतात, यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही चळवळ विश्वासार्हता असणाऱ्या सामाजिक नेत्यांनी चालवावी. आम्ही सोबत राहू, असे म्हणणारे मेघे एकप्रकारे विदर्भवादी राजकीय नेत्यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न उपस्थित करतात. या प्रश्नावर तेलंगणप्रमाणे आमदार-खासदार निवडून आलेले नाही, असा त्यांचा अनुभव, चळवळीस लोकाश्रय नसल्याची अप्रत्यक्ष कबुली देणारा ठरावा. तिसरी बाब म्हणजे, पक्षश्रेष्ठींची इच्छा डावलून आंदोलन रेटता येत नाही, ही त्यांची अनुभूती त्यांना मवाळ करण्याचे प्रमुख कारण ठरावी.
किंबहुना, पुढील वर्षी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र विदर्भाची भावना नव्हे, तर श्रेष्ठींची भावना जपणेच श्रेयस्कर ठरणार असल्याचे मेघे सारख्या मुरब्बी नेत्यास सहज कळावे. स्वत: निवडणुकीत उभे न राहण्याची घोषणा अनेक वेळा केलेले खासदार मेघे हे पुत्र सागरसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांचेच जाहीर प्रकटन आहे. पुत्राला तिकिट हवी की विदर्भ हवा, या प्रश्नाचे उत्तर कु ठलाही राजकारणी तात्काळ देईल. मेघेंचे विदर्भप्रेम बेगडी नाही. अद्याप ते स्वतंत्र विदर्भवादी असल्याचे निक्षून सांगतात. चळवळीस साथ देणार असल्याचेही बोलतात. विदर्भप्रदेश विकास परिषद ही संघटना त्यांनी न गुंडाळता सक्रियच ठेवली आहे. पण, अडीच तपाच्या विदर्भवादी चळवळीच्या अनुभवात त्यांना आलेली अनुभूती या प्रश्नावर त्यांना मवाळ करणारी ठरल्याचे दिसून आले, अशीच त्यांच्या सहकाऱ्यांचीही भावना आहे.