पुरोगामी विचारांच्या नगर जिल्हय़ात महिलांना रोजगार हमीच्या कामावर पाठवून पुरुष मंडळींनी जनावरांच्या छावण्यांवर आराम करण्याचा प्रकार सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामांवर २७ हजार मजूर असून त्यात सुमारे १६ हजार महिलाच आहेत.
कष्टाची, अंगमेहनतीची कामे पुरुषांनी करावी व साधारण कमी कष्टाची कामे महिलांना द्यावीत असा सर्वसाधारण संकेत आहे. शहरी किंवा ग्रामीण भागातही दैनंदिन जीवनात तो पाळला जातोच. दुष्काळात हा संकेत ग्रामीण भागात मोडून पडला आहे. रोजगार हमीच्या कामांचे स्वरूप खोदकामाचेच जास्त आहे. या कामांवर महिलांच मोठय़ा संख्यने काम करताना दिसत आहेत.
एप्रिल २०१३ या एका महिन्याची आकडेवारी हेच सांगते आहे. रोजगार हमीचे काम मोजण्याच्या प्रमाणानुसार एका महिलेने ३० दिवस काम केले व दुसऱ्या महिलेने फक्त २ दिवस काम केले तर २ महिलांनी एकूण ३२ मनुष्यबळ दिवस काम केले. याप्रमाणे एप्रिल २०१३ या एका महिन्यात जिल्हय़ात ४२ हजार ३३४ महिलांनी ७७ हजार ४२ मनुष्यदिवस काम केले. पुरुषांचे काम या तुलनेत कमी म्हणजे ३८ हजार ५१५ पुरुषांनी फक्त ६५ हजार १९० दिवस काम केले असे आहे.
रोजगार हमीच्या कामाचे अनेक प्रकार आहेत व त्या त्या प्रकारांवर मजुरीचे दर आहेत. यात रूरल कनेक्टिव्हिटी म्हणजे ग्रामीण भागातील खडीकरणाचे रस्ते तयार करण्याचे काम आहे. रस्ता खोदून त्यावर खडी टाकणे, हँडरोलरने ती दाबून बसवणे अशा स्वरूपाचे हे काम आहे. भर उन्हात करण्याचे हे काम असून त्याचा दर मुरूम कठीण असेल तर वेगळा, मऊ असेल तर वेगळा असा प्रत्येक घनमीटरला वेगवेगळा आहे. अंगमेहनतीचे असे हे काम आहे.
या कामावर एप्रिल महिन्यात १६ हजार १४४ महिलांनी २५ हजार ६१९ मनुष्यदिवस काम केले. त्या तुलनेत फक्त १२ हजार ३१ पुरुषांनी १३ हजार ९९५ मनुष्यदिवस काम केले. लँड डेव्हलपमेंट (बांधबंदिस्ती) हे काम अन्य कामांपेक्षा बऱ्यापैकी सुलभ असले तरीही ते उन्हात करायचे असल्याने त्यालाही कष्ट आहेतच. याही कामावर एप्रिल २०१३ मध्ये १० हजार १५९ महिलांनी १३ हजार ७७५ मनुष्यबळ दिवस काम केले. त्या तुलनेत ७ हजार ८०० पुरुषांनी ८ हजार २४६ मनुष्यबळ दिवस काम केले असल्याची नोंद आहे.
दुष्काळाच्या तीव्रतेच्या तुलनेत मुळातच रोजगार हमीच्या कामांवर मजुरांची संख्या कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे पुरुषांनी रोजगार हमीच्या कामावर येणे जवळपास थांबवलेच आहे. त्यामुळेच महिलांना या कामावर पाठवले जाते. अगदीच ज्यांचे आडते आहे अशीच पुरुष मंडळी रोजगार हमीवर येणे पसंत करतात व तेही फक्त काही दिवस येऊन नंतर लगेचच बंद होतात. त्यामुळेच ऐन टंचाईच्या काळातही जिल्हय़ातील मजूरसंख्या जास्तीजास्त २९ हजार एवढीच झाली होती व तीही लगेचच कमी होऊन २७ हजारवर स्थिरावली आहे.
त्यातच ग्रामीण भागात बहुसंख्य शेतकऱ्यांची जनावरे छावण्यांमध्ये आहेत. छावण्यांमधील जनावरांचे दूध नेण्याची जनावराच्या मालकांना परवानगी असल्याने सर्वच छावण्यांच्या भोवती जनावरांच्या मालकांचीही एक स्वतंत्र छावणी तयार झाली आहे. छावणीवरच राहायचे व सकाळी जनावरांचे दूध काढून ते डेअरीत टाकण्यासाठी घरच्यांना द्यायचे, नंतर दिवसभर छावणी संचालक जनावरांना व्यवस्थित चारा, पशुखाद्य देतो आहे की नाही यावर लक्ष ठेवायचे एवढेच काम पुरुषमंडळींनी स्वत:ला लावून घेतले आहे. महिलांना मात्र रोजगार हमीच्या कामावर पाठवून अंगमेहनतीची कामे करायला लावली जात आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.