सामाजिक अस्थिरता, स्पर्धा आणि शिक्षणाचे वाढलेले प्रमाण यामुळे शरीराच्या कार्यरचनेचे मेटॅबोलिक व अनुवांशिक (जेनेटिक) या आजाराचे प्रमाण गेल्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. काही समाजांमध्ये हे आजार मुख्यत्वे दिसून येतात. या आजाराच्या निर्मूलनासाठी गेल्या तीन वर्षांपासून आर्य चॅरिटेबल ट्रस्ट विदर्भातील विविध भागात काम करीत असून नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करीत आहे. संस्थेला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उद्या, मंगळवारी २२ जानेवारीला या आजारांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल बरबटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून ‘मेटॅबोलिक’ आजाराचे तज्ज्ञ डॉ. अली जलान व अनुवांशिक तज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव चोपडे यांची व्याख्याने होणार आहे. अनुवांशिक (जेनेटिक) आजारासाठी काय काळजी घेतली पाहिजे, त्यावर उपाय कुठल्या प्रकारे करावे या संदर्भातील माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त व्ही.बी. गोपाल रेड्डी आणि जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित राहणार आहे. शिक्षण व स्पर्धेमुळे उशिरा लग्न होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुस्लिम समुदायामध्ये उतरत्या वयात उतरत्या वयातही बाळाचा जन्म होतो अशी उदाहरणे आहेत. काही जातींमध्ये काका, मामा ,आत्या यांच्या मुलामुलींसोबत विवाह करण्यात येते हे सुद्धा अशा आजारांना निमंत्रण देण्याचा प्रकार आहे. असे प्रकार थांबविण्यासाठी केवळ जनजागृती हा पर्याय नाही तर लोकांची मानसिकता बदलविण्याची गरज आहे. संस्थेने आतापर्यंत मौदा, रामटेक आणि नरखेड या गावांमध्ये ८० पेक्षा अधिक गावात पथनाटय़ाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. गावा गावात शिबीर आयोजित केली जात असून लहान मुलांची काळजी घेण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे. शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांच्या मार्गदशनाखाली गावागावांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे. कार्यशाळेत जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला डॉ. सतीश देवपुजारी, निलेश बरबटे आणि सतीश बरबटे उपस्थित होते.