लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते विदर्भातील तरुण नेतृत्त्वाला राजकारणाची सूत्रे देण्यासाठी सक्रिय झाले आहेत. यातील अनेकांनी निवडणुकीच्या दृष्टीने आपापल्या मतदारसंघात कामे सुरू केली आहेत. गेल्या दोन वर्षांत तरुण मतदारांची वाढती संख्या बघता जास्तीत जास्त तरुणांना समोर आणून विविध पक्षांमध्ये महत्त्वाची पदे दिली जात आहेत. काहींचे वारसदार आणि कट्टर समर्थक राजकारणात स्थिरावले आहेत, तर काहींचे धडपडत असून त्यांना सक्रिय केले जात आहे.
दिवं. भाऊसाहेब मुळक यांचे पुत्र राजेंद्र मुळक यांनीही स्वत:ची ‘अभ्यासू’ अशी प्रतिमा तयार करण्यात यश मिळविले. राज्यमंत्री झाल्यानंतर तरुण वयात मोठी खाती हाताळण्याच्या चालून आलेल्या संधीचा त्यांनी योग्य उपयोग केला आहे. राज्यमंत्री म्हणून त्यांनी ग्रामीण आणि शहर काँग्रेसमध्ये वेगळा ठसा निर्माण केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नागपुरात त्यांच्या नावाची चर्चा आहे. दिवं. गंगाधरराव फडणवीस यांचे पुत्र देवेंद्र फडणवीस यांनी अगदी नगरसेवकापासून सुरुवात करून थेट महापौरानंतर आमदारकी आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. प्रभावी वक्तृत्व आणि विदर्भातील समस्यांचा गाढा अभ्यास याचा त्यांच्या प्रगतीत सर्वाधिक वाटा आहे. प्रत्येक मुद्दय़ांवर त्यांच्याकडे तपशीलवार माहिती आणि आकडेवारी तयार असते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे गेल्या काही दिवसात संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातील विविध भागात सभा आणि मेळावे घेण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे.
 नागपूरचे काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी विशाल मुत्तेमवारला सक्रिय केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्याने तयारी सुरू केली असल्याची माहिती आहे. मुत्तेमवार यांचे निष्ठावंत विकास ठाकरे यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून शहर काँग्रेसचे नेतृत्व तरुणांकडे दिले आहे. मंत्रिपद भूषविणाऱ्या अनिल देशमुखांनी आता सलीलला राष्ट्रवादीची नागपूर जिल्ह्य़ातील जबाबदारी देण्याच्या दृष्टीने पायाभरणी केली आहे. सलील सक्रिय असल्याने राजकीय उठाठेवीत त्यांचा अनेक ठिकाणी सहभाग दिसून येतो. ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख सक्रिय झाले आहेत. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे विदर्भात ते चांगलेच ‘हायलाईट’ झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली.
रोहयो मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत युवक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय झाला आहे. मधल्या काळात काही वादग्रस्त घटनांमुळे कुणाल अडचणीत आला असताना त्यातून बाहेर पडून पुन्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्याला समोर केले जात आहेत. सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदींना राजकारणाची दिशा कळलेली नाही. यातून खुद्द सतीश चतुर्वेदींना हनुमान सेनेची निर्मिती करावी लागली. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा मुलगा जयदीप गेल्या दोन वर्षांत सक्रिय झाला आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे उत्तर किंवा दक्षिण नागपुरातून निवडणूक लढविण्यास जयदीप इच्छुक असून तसे प्रयत्न सुरू केले आहे.

काँग्रेसचे वर्धेचे खासदार दत्ता मेघेंचे चिरंजीव सागर मेघे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाले आहेत. दत्ता मेघे यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी सागरला सक्रिय केले असून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. वर्धेतील दिग्गज नेत्या दिवं. प्रभा राव यांची कन्या चारुलता राव-टोकस यांनी वध्र्यातून काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली असून त्यांचेही नाव चर्चेत आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडेंनी शेखर शेंडे यांना स्थिर केले आहे. बुलढाण्यात आनंदराव अडसूळ यांनी कॅप्टन अभिजितला राजकारणाचा मोकळा करून दिला असून त्यांनी विधाससभेसाठी पुन्हा मतदार संघावर लक्ष्य केंद्रित केले आहे. पुंडलिकराव गवळींनी त्यांची कन्या भावना गवळीला थेट दिल्लीत धाडले. त्या शिवसेनेच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या खासदार आहेत. अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचेही चिरंजीव रावसाहेब आता राजकारणात मुरले आहेत.